मुंबई - कोरोनामुळे 'जेईई मेन्स' ही सामाईक प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी देशभरातून करण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने अट्टहास करत या परीक्षेचे आयोजन केल्याने देशभरात तब्बल दोन लाख 20 हजार विद्यार्थी या परीक्षेला मुकले आहेत. यासंबंधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी ट्विट केले आहे.
लाखो विद्यार्थी परीक्षेला मुकल्यानंतरही केंद्रीय मंत्री पोखरीयाल यांनी या परीक्षार्थींचे कौतुक केले आहे. केंद्र आणि देशातील राज्य सरकारच्या सर्वतोपरी सहकार्याने जेईई मेन्स परीक्षा सुरळीत पार पडली. यामुळे मी या सर्व राज्य सरकारचे कौतुक करतो, असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले. तर विद्यार्थ्यांच्या गैरहजरीबद्दल बोलताना त्यांनी या परीक्षा जानेवारी महिन्यातही झाल्याने आत्ताच्या परीक्षांना बसण्याची विद्यार्थ्यांना गरज भासली नसरणार, असा तर्क लावला आहे. मात्र तरीही आम्ही संख्या किती आहे, याची माहिती घेत असल्याचे पोखरीयाल म्हणाले.
देशभरात जेईई (मेन)च्या परीक्षेला देशभरातून ९ लाख ५३ हजार ४७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ लाख ५८ हजार विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. तर या परीक्षेला प्रत्यक्षात नोंदणी करूनही तब्बल ९५ हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसून शकले नव्हते. तर जे परीक्षेला बसले, त्यातही तब्बल २ लाख २० हजार आणि नोंदणी करून परीक्षेला न आलेले असे एकूण ३ लाख १५ हजार विद्यार्थी परीक्षेपासून दूर राहिल्याचे समोर आले आहे.