मुंबई-टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या 'बार्क'चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. 24 डिसेंबर 2020 रोजी टिआरपी घोटाळ्याप्रकरणी पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती. सत्र न्यायालयाने दासगुप्ता यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने आता त्यांच्या वकीलाकडून मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्यात येणार आहे.
आर्थिक फायद्यासाठी एका वृत्तवाहिनीला मदत केल्याचा आरोप
'बार्क'चे सीईओ असताना पार्थो दासगुप्ता यांनी एका वृत्तवाहिनीच्या फायद्यासाठी टीआरपीमध्ये फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दासगुप्तांच्या टीआरपी घोटाळ्यात सहभागासंदर्भातील अनेक पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. टीआरपी घोटाळ्यातून दासगुप्ता यांना मोठा आर्थिक फायदा झाल्याचे देखील पोलिसांनी म्हटले आहे. पार्थो दासगुप्ता यांच्याकडून न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र पार्थ दासगुप्तांच्या जामीनाला तपास पथकाकडून विरोध करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
पार्थो दासगुप्तांवर जेजे रुग्णालयात उपचार
पार्थो दासगुप्ता यांना मधुमेहाचा त्रास असून, त्यांच्या जीविताला यामुळे धोका होऊ शकतो. असा युक्तीवाद पार्थो दासगुप्ता यांच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला होता. सध्या त्यांच्यावर जेजे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याचंही न्यायालयाला सांगण्यात आले. यासंदर्भात पोलिसांना हवे असलेले सर्व पुरावे मिळाले असून, पार्थ दासगुप्ता यांच्या चौकशीतून आणखीन काही मिळणार नसल्याचाही युक्तीवाद त्यांच्या वकीलाने न्यायालयात केला होता. दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पार्थो दासगुप्ता यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.