मुंबई -मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. मागील आठवड्यात 1300 ते 1500 रुग्ण आढळून आले. रविवारी 1962, सोमवारी 1712, मंगळवारी 1922, बुधवारी 2377 तर आज 2877 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 8 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षभरात आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
18 हजार 424 सक्रिय रुग्ण -
मुंबईत आज 2877 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 52 हजार 835 वर पोहचला आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 555 वर पोहचला आहे. 1193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 21 हजार 947 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 18 हजार 424 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 136 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 34 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 267 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 36 लाख 37 हजार 930 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.