मुंबई -मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आज मुंबईत 1167 नवे रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 1167 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 21 हजार 698 वर पोहचला आहे. आज 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 453 वर पोहचला आहे. 376 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 1 हजार 57 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 8320 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 294 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 51 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 815 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 31 लाख 85 हजार 334 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.