मुंबई - वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो 1 कालपासून वाहतूक सेवेत दाखल झाली आहे. काल पहिल्या दिवशी मेट्रोला खूपच कमी प्रतिसाद मिळाला. काल दिवसभरात 12738 मुंबईकरांनी मेट्रोतून प्रवास केला. तर आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 11808 प्रवाशांची नोंद झाली असून, आजच्या शेवटच्या फेरीपर्यंत हा आकडा 17 हजार च्या घरात जाईल, असा दावा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने केला आहे.
आज आकडा थोडा वाढला आहे, पण तो कमीच असल्याचे म्हटले जात आहे. कॊरोना-लोकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सात महिने बंद असलेली मेट्रो 1 कालपासून सुरू झाली आहे. पण कोरोनाच्या काळात मेट्रो 1 ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 6727 जणांनी मेट्रोने प्रवास केला होता. तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा आकडा 8049 पर्यंत पोहचला. रात्री साडेआठला सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अर्थात पहिल्या दिवशी 12738 जणांनी मेट्रो प्रवास केला.