मुंबई - मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग दोन दिवस 8 हजारांच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. काल त्यात वाढ होऊन तब्बल 9 हजार 90 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात आज आणखी वाढ झाली आहे. मुंबईत आज तब्बल 11 हजार 163 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची आज नोंद झाली आहे.
कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 4 लाख 52 हजार 445 वर
मुंबईत आज तब्बल 11 हजार 163 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत, यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 52 हजार 445 वर पोहोचला आहे. आज 25 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 776 वर पोहोचला आहे. 5263 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने, रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 71 हजार 628 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 68 हजार 052 जणांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवस इतका आहे. दरम्यान मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 74 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 700 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 42 लाख 69 हजार 175 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
हे विभाग आहेत हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागांत कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.