मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत मोठा स्फोट केला होता. यानंतर लगेच दुपारी मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचा इन्कार करत हा फुसका बार असल्याचे सांगितले होते. या घडामोडीनंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवाब मलिक वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत कारण त्यांना आपला जावई आणि काली कमाई वाचवायची आहे, असे ट्वीट करत अमृता फडवणीस यांनी नवाब मलिकांवर हल्लाबोल केला आहे.
काय आहे ट्विटमध्ये.. -
एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखडे हे नवाब मलिक यांच्या रडारवर पूर्वीपासून राहिलेले आहेत. परंतु, आत्ता काही दिवसापासून या प्रकरणांमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांना आणल्यानंतर फडवणीस कुटुंबाकडून सुद्धा आता मलिक यांच्या आरोपांना प्रतिउत्तर दिले जात आहे. आज देवेंद्र फडवणीस यांनी नवाब मालिकांची अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा मोठा स्फोट केल्यानंतर नवाब मलिक यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन फडवणीस यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. त्यावरून आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडवणीस यांनी, बिघडलेले नवाब हे फक्त एकामागून एक पत्रकार परिषदा घेऊन आरोपांना उत्तर देत आहेत. त्यातून ते खोटं बोलून आणि मक्कारी करून हे सर्व करत आहेत, कारण त्यांना आपला जावई व काळी कमाई वाचवायची आहे, असा घणाघात अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
यापूर्वीही नवाब मलिक व अमृता फडणवीस यांच्यात ट्विटर वॉर -
नवाब मलिकांनी यापूर्वी ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो ट्विट केला होता. त्यानंतर भाजपाचे ड्रग्ज पेडलरशी काय कनेक्शन? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर आरोप लावले. देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलरसोबत संबंध आहेत. फडणवीसांच्या संरक्षणानेच राज्यात ड्रग्जचा धंदा सुरु असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला होता. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन नवाब मलिकांच्या आरोपावर प्रत्युत्तर दिले होते. अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटले होत की, चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते. आता पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांनी नवाब मालिकांवर ट्विटरद्वारे निशाणा साधला आहे.