मुंबई भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsav) १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने पालिकेने, मुंबईमध्ये ३५ लाख घरे आणि आस्थापनांवर ५० लाख तिरंगा ध्वज लावण्याचे (Tiranga illumination on the historic building) उद्दिष्ट ठेवले आहे. मुंबईमधील सरकारी व ऐतिहासिक इमारतीवर तिरंगी रोषणाई केली जाणार आहे. मुंबईची जागतिक ओळख असलेल्या आणि राणीचा कंठहार (क्वीन नेकलेस) (historic building Queen Necklace) म्हणून नावाजलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरात एकूण २८ निवासी इमारतींवर, महानगरपालिकेच्या वतीने विद्युत रोशनाई केली जाणार आहे.
पालिकेकडून अशी केली जनजागृतीदेशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईमध्ये महानगरपालिकेकडून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान, 'हर घर तिरंगा' अभियानासाठी जनजागृती करण्यात आली. त्यासाठी गर्दीची ठिकाणे असलेली रेल्वे स्टेशन, शाळा, महाविद्यालय, मार्केट, उद्याने, सरकारी कार्यालये, हॉस्पिटल आदी ठिकाणी जनजागृती करणारे बॅनर आणि फलक लावण्यात आले. मुंबईत नागरिकांचे लक्ष वेधून घेईल, अशा ठिकाणी ५०० ठिकाणी होर्डिंग लावण्यात आली आहेत. ३५० बस स्टॉपवर जाहिरात करण्यात आली आहे. एनजीओ आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन सर्वत्र जनजागृती करण्यात आली.
मरीन ड्राईव्ह परिसरात तिरंगी विद्युत रोषणाई 'हर घर तिरंगा' अभियान मुंबई महानगरात सर्वत्र राबविले जाणार आहे. या निमित्ताने मरीन ड्राईव्ह परिसरात तिरंगी विद्युत रोषणाई विशेष आकर्षणाचा भाग असणार आहे. मरीन ड्राईव्ह येथील एकूण २८ निवासी स्वरुपाच्या इमारतींवर महानगरपालिकेच्या वतीने विद्युत रोशणाई केली जाणार आहे. तर, इतर व्यावसायिक इमारतींवर संबंधितांनी विद्युत रोशणाई करण्याचे आवाहन, महानगरपालिकेने केले आहे. तिरंगा विद्युत रोशणाईसाठी अंदाजे सुमारे ४८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामधील अर्धा खर्च आयनॉक्स, पार्कसन्स पॅकेजिंग लिमिटेड, ज्युपिटर डायकेम या कंपन्यांनी प्रत्येकी ८ लाख रुपये, असा एकूण २४ लाख रुपयांचा निधी धनादेश स्वरुपात; महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याकडे सादर केला आहे.