मुंबई -शहरातील तापमान वाढल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे. यामुळे मान्सून कधी दाखल होणार याची प्रतिक्षा आहे. या सर्वांसाठी खुशखबर म्हणजे एक जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये या चार महिन्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
सर्वात पहिला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर महाराष्ट्र दाखल होतो. 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणासह मुंबईत दाखल होईल. 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या 98 टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.