मुंबई- महापौरांच्या बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. महापौरांच्या नव्या बंगल्यासाठी पालिकेने महापौर बंगल्याशेजारीच पालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याच्या भूखंड आरक्षित केला आहे. त्यावर महापौरांचा आलिशान बंगला उभारला जाणार आहे. त्यात एक मजली महापौर बंगला, स्विमिंग पूल, पाच बेडरूम, होम थिएटर, भूमिगत वाहनतळ, सुरक्षा रक्षकांसाठी व्यवस्था असणार आहे. तर बाजूलाच महापौर कार्यालयासाठी एक मजली इमारत उभारली जाणार आहे. त्यासाठी पालिका तब्बल ७ ते ८ कोटी रुपये खर्च करणार आहे. येत्या दोन ते तीन वर्षात मुंबईच्या महापौरांचा आलिशान बंगला उभारला जाणार आहे.
महापौरांचा नवीन आलिशान बंगला शिवाजी पार्क येथील मुंबईच्या महापौरांच्या बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. यामुळे महापौरांना आपले निवासस्थान रिकामे करून राणीबागेतील पर्यायी बंगल्यात जावे लागले आहे. मुंबईच्या महापौरांना साजेसा बंगला असावा अशी मागणी होत होती. त्याअनुषंगाने महापौर बंगल्या शेजारील पालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखाण्यासाठी असलेला भूखंड महापौर निवासस्थानासाठी आरक्षित करण्यात आला. नुकताच या बाजूला असलेला भूखंड पालिकेने ताब्यात घेऊन महापौर बंगल्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर महापौरांच्या नव्या बंगल्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.
दादर शिवाजी पार्क येथील जुन्या महापौर बंगल्याच्या व स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाच्या बाजूलाच असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या जिमखान्याच्या २ हजार ७५६ चौरस मीटर भूखंडावर नवा महापौर बंगला उभा राहणार आहे. या भूखंडावर १ हजार १०० मीटर जागेवर महापौरांचा नवीन एक मजली आलिशान बंगला बांधण्यात येणार आहे. त्यात १० बाय २५ फुटाचे आलिशान स्विमिंग पूल, पाच बेडरूम, होम थिएटर, भूमिगत वाहनतळ, सुरक्षा रक्षकांना राहण्यासाठीही व्यवस्था असणार आहे. तळ मजल्यावर लिव्हिंग, डायनिंग रूम, किचन, हॉल, होम थियटर, वाचनालय, स्विमिंग पूल आणि बाथरूम असणार आहे. तर पहिल्या मजल्यावर पाच बेडरूम आणि आलिशान रूम असणार आहेत. येत्या दोन ते तीन वर्षात ७ ते ८ कोटी रुपये खर्चून हा नवा महापौर बंगला उभारला जाणार आहे. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी या आलिशान बंगल्याच्या डिझाईनला नुकतीच मंजुरी दिली.
बंगल्याच्या बाजूला महापौर कार्यालय -
महापौर बंगल्याच्या बाजूला एक कार्यलयाची इमारत उभारली जाणार आहे. त्यात २०० लोक एकाचवेळी बसतील अशा एका हॉलची व्यवस्था असणार आहे. एक बेडरूम, ३ मिटिंग रूम, खानपान सेवा आणि शौचालय तसेच सुरक्षा रक्षकांसाठी एक विश्रामगृह असणार आहे. त्यात महिला आणि पुरुष सुरक्षा रक्षकांना कपडे बदलण्यासाठी वेगवेगळ्या रूमची व्यवस्था असेल.