महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आता कुणी आत्मपरीक्षण करावं आणि कुणी आत्मचिंतन, हा ज्याचा त्याचा प्रश्न- एकनाथ शिंदे

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील पाच जागांसाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Dec 4, 2020, 10:39 PM IST

मुंबई -विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागा जिंकत महाविकास आघाडीने भाजपाला चितपट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा इतका मोठा विजय मिळवला आहे. हा विजय खूप मोठा आहे अशी प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर आता कुणी आत्मपरीक्षण करावं आणि कुणी आत्मचिंतन करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे म्हणत त्यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू प्रकल्पाच्या पाहणी दौऱ्यावर असतांना ते प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
महाविकास आघाडीने मारली जोरदार मुसंडी-
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील पाच जागांसाठी नुकत्याच निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीची मतमोजणी कालपासून सूरु झाली आणि आज निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. आघाडीने चार जागा त्यांनी जिंकल्या आहेत. भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा नागपूर मतदार संघ महाविकास आघाडीने काबीज केला आहे. तर पुणे मतदार संघ भाजपाचा गड मानला जात होता. तिथे चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण पुण्याचा गडही महाविकास आघाडीने काबीज करत भाजपाला धक्का दिला आहे. त्यामुळे हा विजय मोठा असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना-अतिवृष्टी काळात उल्लेखनीय काम-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर 100 वर्षात राज्यावर जे संकट आले नव्हते ते कोरोना महामारीचे संकट राज्यावर ओढवले. तर त्यात अतिवृष्टी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक संकटांनीही भर टाकली. पण या सर्व संकटाना आघाडी सरकार समोरे गेले. या सर्व कठीण काळात मुख्यमंत्र्यांनी चांगले आणि योग्य, ऐतिहासिक निर्णय घेतले. शेतकऱ्यांना 21 हजार कोटींची कर्जमाफी दिली आहे. तर 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ केले आहे. चक्रीवादळात 10 हजार कोटीची मदत केली आहे. इतकेच नव्हे तर कोविड काळात कोणत्याही मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर मोठा परिणाम होऊ न देता प्रकल्प पुढे नेले, असे म्हणत शिंदे यांनी आपल्या एका वर्षाच्या कामाचा पाढा वाचला.मुंबई पालिकेबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील-राज्यातील सत्ता हातून निसटली असताना आता भाजपाने 'मिशन मुंबई' हाती घेत मुंबई पालिका ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. अशावेळी मुंबई पालिकेच्या निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? यावर शिंदे यांना विचारले असता हा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळे याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details