मुंबई -शहरातील पवई परिसरात असलेल्या एका ज्वेलरीच्या दुकानात 30 लाख 42 हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या नोकराला पवई पोलिसांकडून अवघ्या 6 तासात अटक करण्यात आली आहे. 16 जूनला पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुंगा गाव येथील रिया गोल्ड या ज्वेलर्स दुकानामध्ये काम करणाऱ्या हिरालाल नेहरुलाल कुमावत (26 वर्ष) आरोपीने दुकानात मालक नसताना तब्बल 30 लाख 42 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून फरार झाला होता.
पालघर येथे अडवून आरोपीस घेतले ताब्यात -
या संदर्भात दुकानाचे मालक अशोक कुमार काळूराम मांडोत यांनी पवई पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता त्यांच्या लक्षात आले की एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीकडून आरोपीने राजस्थान येथे जाण्यासाठी मोटार बुक केली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही गाडी राजस्थान येथे निघून जात असताना पोलिसांनी कासा पोलीस ठाण्याशी संपर्क साधून सदरची गाडी पालघर येथे अडवून आरोपीस ताब्यात घेतले होते.
अटक आरोपी एक महिन्यापूर्वी जामिनावर सुटून आला होता बाहेर -
या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक करत चोरी केलेला सर्व ऐवज हा पुन्हा मिळवला आहे. अटक करण्यात आलेला आरोपीला या अगोदरही अशाच एका प्रकरणांमध्ये खांदेश्वर पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. एक महिन्यापूर्वी तो चोरीच्या गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर आला होता.