मुंबई -मुंबईतील सुमारे 2 हजार किमीच्या रस्त्यावर केवळ 927 खड्डे आहेत, असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे 48 कोटींंची तरतूद केली. ती याच 927 खड्यांसाठी का, असा उपरोधिक सवाल करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल, असा टोलाही शेलार यांनी लगावला आहे. मुंबईतील खड्डे हा विषय सध्या गाजत असून, भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी या विषयावर आज (दि. 27 सप्टेंबर) भाष्य करीत पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला.
मुंबई महापालिकेने खड्ड्याबाबत जे पोर्टल तयार केले. त्यावर केवळ 927 खड्डे असल्याचे नमूद झाले आहे. केवळ खड्डे बुजवण्यासाठी 48 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मग तो या 927 खड्यांसाठीच होता का? असा सवाल ही आमदार आशिष शेलार यांनी केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी सुरू आहे चौकशीत सत्य समोर येईलच.
वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही
मुंबईचे संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यांसमोर कधी असते का, संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का, याचे कारण नवीन पदपथ (फूटपाथ) करायचा विषय आला की फक्त वरळी. सिग्नल आणि लाईटचे खांब सुशोभित करायचे असतील तर वरळी. मुंबईत सर्वत्र ब्रिज आहेत पण पुलाच्या खाबांचे सुशोभीकरण फक्त वरळीत होते. आता थ्रीडी मॅपिंग करायचे आहे तर तेही वरळीत. कोविड सेंटर बनवायचे असेल तर तेही वरळीत. पाण्याचा निचरा करणारे पंप बसवायचे असतील तर मग कलानगर. वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही, असा सवालही आमदार आशिष शेलार यांनी केला.
आरोग्य खात्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी