मुंबई -कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे लोण देशभरात पसरले असतानाच मुंबईतील उपनगरीय लोकलमधून हिजाब परिधान केल्याने एका मुस्लिम महिलेला लोकल रेल्वेत बसण्यास काही प्रवाशांनी नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबतची माहिती त्या महिलेच्या पती डॉ. परवेझ मांडवीवाला यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे.
सोशल मीडियावर ट्विट व्हायरल -डॉ. परवेझ मांडवीवाला यांनी ट्विट करत सांगितले की, माझ्या पत्नीला आज लोकल रेल्वेत बसण्यास नकार देण्यात आला कारण तिने हिजाब घातला होता. एका गृहस्थाने तिच्यासाठी आपली सीट रिकामी केली, परंतु माझी पत्नी आमच्या तान्ह्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी बसण्यास जात असतानाही इतर प्रवाशांनी त्याऐवजी साडी नेसलेल्या काही महिलांनी सीट घेण्याचा आग्रह केला. काही लोकांना ही घटना प्रत्यक्षात घडली यावर विश्वास ठेवणे कठीण जात असेल. लोकल रेल्वेत आज घडलेल्या घटनेचा मला आणि माझ्या पत्नीला मोठा धक्का बसला आहे. नागरिकांची वर्तवणूक अत्यंत दुर्देवी आणि किळसवाणी आहे. डॉ. परवेझ मांडवीवाला यांचे हे ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेक नागरिक वेगवेळी प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकाराची सर्वत्र निंदा होत असतानाच खुद्द मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेय यांनी ही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हा प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.