मुंबई- राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून याबाबतची माहिती गृह विभागाने मागवली आहे. मात्र, न्यायालयाच्या नियमांत बसणारेच गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
बैलगाडा शर्यतीला बंदी घातल्यानंतर बैलगाडा मालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठली आहे. त्यामुळे बंदी काळात बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील विविध पोलीस ठाण्यात बैलगाडा शर्यती अंतर्गत दाखल गुन्ह्यांची माहिती गृह विभागाने मागवली आहे.