पुणे -महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीला अखेर सुरूवात झाली आहे. शुक्रवारी खटल्यातील पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली आहे. हत्यच्या घटनेच्या तब्बल आठ वर्षांनंतर या प्रकरणाचा खटला अखेर सुरू झाला आहे.
अविनाश धवलभक्त यांची साक्ष -
सदाशिव पेठेतील डॉ. दाभोलकर राहत असलेल्या अमेय अपार्टमेंटमधील त्यांचे शेजारी अविनाश धवलभक्त यांची साक्ष नोंदविण्यात आली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संबंधित सदनिकेतून त्यांच्या वापराच्या काही वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. त्या प्रक्रियेत धवलभक्त पंच होते, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयास दिली. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे उलटल्यानंतर या प्रकरणाचा खटला अखेर सुरू झाला असून यातील पहिल्या साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली. पोलिसांनी माझ्यासमोर सदनिकेत पंचनामा केला होता. त्यातील काही वस्तू मी ओळखू शकतो, असे सांगत धवलभक्त यांनी त्यावेळी जप्त करण्यात आलेल्या काही वस्तू ओळखल्या आहेत. यात पुस्तक, डायरी, कपडे असे काही साहित्यांचा समावेश आहे.
बचाव पक्षाचा युक्तिवाद -
पोलिसांनी काही साहित्य जमा केले होते. उलटतपासणीवेळी बचाव पक्षातर्फे अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी धवलभक्त यांनी केवळ पंचनाम्यावर सह्या केल्या होत्या. त्यात काय होते याची कल्पना त्यांना नव्हती. तसेच पूर्ण घराचा पंचनामा त्यांच्यासमोर झाला नाही, असा युक्तिवाद न्यायालयासमोर केला. या प्रकरणात अॅड. प्रकाश साळशिंगीकर, अॅड. सुवर्णा आव्हाड-वस्त हेही बचाव पक्षाच्या वतीने कामकाज पाहत आहेत.
पुढील सुनावणी १३ नोव्हेंबरला -
यावेळी अॅड. आव्हाड यांनी डॉ. दाभोलकर यांच्या शवविच्छेदनाची सीटी आणि त्यांच्या एक्स-रेची कॉपी मिळण्याची विनंती न्यायालयात केली. न्यायालयाने सीबीआयऐवजी आमच्याकडे या कॉपी सुपूर्द कराव्यात, असे त्यांच्या अर्जात नमूद होते. त्यानुसार न्यायालयाने संबंधित यंत्रणेस या कॉपी बचाव पक्षास उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तर या खटल्यास सरकारी वकिलांना साहाय्य करीत बाजू मांडण्याची संधी मिळण्याबाबत अॅड. ओंकार नेवगी यांनी न्यायालयात अर्ज केला होता. त्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. खटल्याची पुढील सुनावणी १३ नोव्हेंबरला होणार असून त्यात फिर्यादी असलेले तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक नारायण रानगट यांची साक्ष नोंदविली जाणार आहे.