महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सोसायटीच्या अध्यक्ष-सचिवांना मिळणार तात्पुरते विशेष पोलिस अधिकाऱ्याचे अधिकार - corona news

गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यात यावी यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, ज्या महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींना निधीची गरज असेल त्यांनी प्रस्ताव पाठवावेत, तसेच औषधांचा काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

Breaking News

By

Published : Apr 7, 2021, 2:17 PM IST

मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असून, राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी राहील यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, गृहविलगीकरणात असलेले रुग्ण घरातच राहावेत याची काळजी घ्यावी आणि त्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार द्यावेत, असे निर्देश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

आणखी काय निर्देश दिले?

कोरोना रुग्णांची संख्या जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे, त्यांच्या घरावर स्टीकर लावणे, परिसरात बॅनर लावणे, कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे, रुग्णांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉलसेंटर कार्यान्वित करणे आदी उपाययोजना आखण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचबरोबर मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करावेत, कोरोना उपचार केंद्रांत महिला रुग्णांची विशेष काळजी घ्यावी, कोणताही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी, उपचारांचा व इतर सुविधांचा दर्जा चांगला राहील यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करावी, उन्हाळा सुरू झाल्याने पुरेशा प्रमाणात पंखे, एअर कुलर द्यावेत, शॉर्ट सर्किट होणार नाही याची काळजी घ्यावी असेही निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.

औषधांचा काळाबाजार रोखण्याचे निर्देश

कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच रेमडेसिवीरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे औषधांचा तुटवडा निर्माण होऊन, काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच रक्ताचा पुरवठा नियमितपणे व्हावा यासाठी विविध स्वयंसेवी संस्था, आणि पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. गर्दीचे नियमन करावे, मास्क परिधान करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, अशा विविध सूचनाही त्यांनी दिल्या.

निधीची गरज असलेल्यांनी प्रस्ताव पाठवावेत

ज्या महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींना निधीची गरज आहे, त्यांनी प्रस्ताव पाठवावेत. त्यांना डीपीडीसी आणि एसडीआरएफमधून निधी देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निधी मंजूर करण्यात येईल, तसेच नगरविकास विभागाच्या माध्यमातूनही निधी दिला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना आखाव्यात, त्यासाठी निधीची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेतली जाईल. मात्र कोरोना रुग्णांना कोणत्याही असुविधेला तोंड द्यावे लागणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी असे एकनाथ शिंदे म्हणालेत.

हेही वाचा -विमान प्रवाशांनी कोरोना नियम मोडल्यास कठोर कारवाई; मुंबई पालिकेची सुधारित नियमावली

ABOUT THE AUTHOR

...view details