मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत आहे. रविवारी २५५० रुग्णांची नोंद झाली. सोमवार ते बुधवार असे सलग तीन दिवस १८०० च्या वर रुग्ण आढळून आले आहेत. आज गुरुवारी त्यात घट होऊन, १३८४ नव्या रुग्णांची नोंद झाली ( Mumbai Corona Update ) आहे. आज १२ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या मुंबईत १८ हजार ४० सक्रिय रुग्ण आहेत.
२७ इमारती सील
मुंबईत आज (२७ जानेवारीला) १३८४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ५६८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ४१ हजार ७४७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४ हजार ३८४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ५८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १८ हजार ४० सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी १९४ दिवस इतका आहे. मुंबईमधील २७ इमारती सील आहेत. २० जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.३५ टक्के इतका आहे.
९१.८ टक्के बेड रिक्त
मुंबईत आज आढळून आलेल्या १३८४ रुग्णांपैकी ११६२ म्हणजेच ८४ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज १८४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ४२ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३७,८२७ बेडस असून, त्यापैकी २९२७ बेडवर म्हणजेच ७.७ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९२.३ टक्के बेड रिक्त आहेत.