मुंबई : उद्योजक मुकेश अंबानींच्या घराबाहेर आढळलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी ठाण्यातील रेतीबंदर खाडीत आढळून आला होता. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन टीमला गाळात रुतलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळला होता. हिरेन हे गुरूवारपासून बेपत्ता होते. मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या मृत्युचे गूढ वाढले आहे. त्यांच्या मृत्युमागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.
मास्कखाली होते पाच रुमाल
मनसुख हिरेन याच्या तोंडावर असलेल्या मास्क खाली पाच हात रुमाल आढळून आले होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर मास्क हटविल्यावर ही बाब समोर आली. याबाबत एक व्हिडिओही स्थानिकांनी काढला आहे.
मुलाने व्यक्त केली घातपाताची शंका
मनसुख हिरेन यांच्या मृत्युनंतर एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. हिरेन यांचा मुलगा आणि एक सामाजिक कार्यकर्ता यांच्यातील हे संभाषण आहे. वडिलांचा मृत्यु हा घातपात असल्याची शंका त्यांच्या मुलाने व्यक्त केली आहे.
कळवा रुग्णालयात सचिन वझेंची भेट
मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असलेल्या कळवा रुग्णालयात मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वझे हे चौकशीसाठी हजर झाले होते. त्यांनी रुग्णालयाच्या डॉक्टर आणि स्थानिक पोलिसांसोबत चर्चा केली. त्यानंतर ते निघून गेले होते.