मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबईतील ( Corona in Mumbai ) पहिला रुग्ण 11 मार्च 2020 रोजी आढळून आला. कोरोना विषाणूच्या प्रसाराला आज 2 वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन वर्षांच्या काळात कोरोनाच्या तीन लाटा आल्या असून त्या तीनही लाटा आटोक्यात आणण्यात मुंबई महापालिका प्रशासनाला यश आले आहे.
धारावी, मुंबई मॉडेल -
मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू होताच रुग्णांवर योग्य उपचार व्हावेत म्हणून पालिकेने पालिका सरकारी तसेच खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन त्यामधील बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर सज्ज केली. जंबो कोविड सेंटर ( Jumbo Covid Center ) उभारली. धारावी सारख्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रसार रोखता यावा म्हणून डॉक्टर आपल्या दारी. ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट आदी संकल्पना राबवण्यात आल्या. त्या उपाययोजना 'धारावी मॉडेल' व 'मुंबई मॉडेल' ( Dharavi Model and Mumbai Model ) म्हणून ओळखल्या जात आहेत. 'धारावी मॉडेल' व 'मुंबई मॉडेल' याची चर्चा जगभरात करण्यात आली.
हेही वाचा : Mumbai Corona Update : मुंबईत ६४ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद
१० लाख ५७ हजार कोरोना रुग्ण -
मुंबईत दोन वर्षांच्या काळात कोरोनाच्या १० लाख ५७ हजार १३४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३७ हजार १५४ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४०५ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ९२६६ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. ३ ते ९ मार्च या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०१ टक्के इतका आहे.मुंबईत १० मार्च २०२२ च्या आकडेवारीनुसार रुग्णालयांमध्ये २८,५२३ बेडस असून त्यापैकी २०४ बेडवर म्हणजेच ०.७ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ९९.३ टक्के बेड रिक्त आहेत.
असे झाले रुग्ण कमी -
मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली. ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. सध्या २१ फेब्रुवारीला ९६, २६ फेब्रुवारीला ८९, २८ फेब्रुवारीला ७३, १ मार्चला ७७, २ मार्चला १००, ३ मार्चला ८०, ४ मार्चला ७८, ५ मार्चला ६५, ६ मार्चला ४६, ७ मार्चला ३८, ८ मार्चला ६०, ९ मार्चला ५४, १० मार्चला ६४ रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा :Mumbai Corona Update : मुंबईतून कोरोनाची लाट संपण्याच्या मार्गावर.. गेल्या २ वर्षातील सर्वात कमी रुग्णांची नोंद
मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिली शून्य मृत्युची नोंद झाली आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये ११, १५, १८, २०, २२, २५ आणि ३० तारखेला शून्य मृत्यूची नोंद झाली. २०२२ मध्ये २ जानेवारी, फेब्रुवारीत १५, १६, १७, २०, २३, २५, २६, २७, २८ फेब्रुवारीला तर मार्चमध्ये १ ते ५ आणि ७ ते १० मार्च दरम्यान एकही मृत्यूची नोंद झाली नाही. आतापर्यंत एकूण २७ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात ९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.