महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दोन हजार गावांची जातीवाचक नावे बदलली - मंत्री धनंजय मुंडे

राज्यात हजारो गावांची नावे आजही जातीवाचक आहेत ही नावे बदलण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतल्यानंतर आतापर्यंत दोन हजार गावांची नावे बदलण्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे याबाबत विरोध होत नसल्याचा दावाही त्यांनी केला.

मंत्री धनंजय मुंडे
मंत्री धनंजय मुंडे

By

Published : Jun 15, 2022, 9:58 AM IST

मुंबई -राज्यात हजारो गावांची नावे आजही जातीवाचक आहेत ही नावे बदलण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतल्यानंतर आतापर्यंत दोन हजार गावांची नावे बदलण्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे याबाबत विरोध होत नसल्याचा दावाही त्यांनी केला. समाज कितीही पुढारलेला असला तरी अजूनही गाव गाड्यांमध्ये जातीचा लवलेश शिल्लक आहे. विशेषतः राज्यातील ग्रामीण भागामध्ये आहे. सुतार गल्ली, लोहार गल्ली, बुरुड गल्ली, सोनार गल्ली, मांगवाडा, महारवाडा, अशी जातीवाचक नावे आजही हजारो ठिकाणी आहेत ही नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला.

गाववाड्यांना समताधिष्ठित नावे -ग्रामीण व शहरी भागातील गाववाड्या, वस्त्यांची जातिवाचक नावे रद्द करून त्यांना समताधिष्ठित किंवा महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामविकास,नगरविकास, महसूल या विभागांशी समन्वय साधून गाव-वस्त्यांची जातिवाचक नावे कायमची हद्दपार व्हावीत, या दृष्टीने कार्यपद्धती अंतिम करण्यात आली. ग्रामविकास, नगरविकास व महसूल आदी विभागांशी समन्वय साधून गाव-वस्त्यांची जातीवाचक नावे बदलली जात आहेत.

शरद पवारांच्या सूचना -राज्यातील गावांची जातीवाचक नावे बदलण्यात संदर्भात मंत्रिपदी शपथ घेताच शरद पवार यांनी आपल्याकडे लेखी सूचना देत मार्गदर्शन केले होते. त्यांचा अतिशय संवेदनशील असलेला हा सल्ला राज्य सरकारने शिरोधार्य मानून त्वरित यासंदर्भात मंत्रिमंडळात निर्णय घेतला, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले

दोन हजार गावांची बदलली नावे -राज्यातील दोन हजार गावांची जातीवाचक नावे बदलण्यात आली असून अजूनही राज्यातील 17 हजार गावांची नावे बदलण्यात येत आहेत. राज्यात एकूण 19 हजार वाड्यावर त्यांची जातीवाचक नावे आढळली असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. येत्या वर्षभरात उरलेल्या 17 हजार गावांची नावे बदलण्याचा कार्यक्रम वेगाने राबवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

काय असते प्रक्रिया ? -जातीवाचक नाव बदलण्यासाठी संबंधित गावाने अथवा ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव करायचा असतो तर नगरपालिका नगरपरिषद हद्दीतील अशा वस्त्यांची नावे बदलण्यासाठी संबंधित नगरपालिका नगरपरिषद आणि ठराव करून तो शासनाकडे पाठवल्यास, अशा गावांची नावे त्यांनी सुचवल्याप्रमाणे बदलली जातात. याबाबत शासन कोणतीही सक्ती करत नाही, असेही त्यांनी सांगितले.

कोणाचाही विरोध नाही -राज्यातील जातीवाचक गावांची नावे बदलण्यासाठी आम्ही सर्वत्र फिरत आहोत. विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अशी नावे आहेत. मात्र, कोणत्याही गावातील नागरिकांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नावे बदलण्यासाठी विरोध केला नसल्याचे मुंडे यांनी सांगितले. सामाजिक अभिसरणाच्या या प्रक्रियेला आता अधिक वेग दिला जाणार असून लवकरच राज्यातील सर्व जातीवाचक गावांची नावे बदललेली दिसतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा -Mumbai High Court : कांजुर कारशेड भूखंड नेमका कुणाचा आज उच्च न्यायालयात होणार 'फैसला'

ABOUT THE AUTHOR

...view details