मुंबई- कोरोनाची लाट आटोक्यात येत असल्याने 'ब्रेक द चैन'अंतर्गत निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. तर पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे, असे परिपत्रक मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जारी केले आहे.
सकाळी जमावबंदी, रात्रीची संचारबंदी
मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे. तर, ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे, सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात मंगळवारपासून (दि. 3 ऑगस्ट) शिथिलता देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मुंबईमधील दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी होती. त्यामुळे मुंबईत सायंकाळी ५ पर्यंत जमावबंदी तर सायंकाळी ५ वाजल्यानंतर संचारबंदी लागू केली होती. आता राज्य सरकराने निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्याने महापालिकेने मुंबईमधील दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी रात्री ११ वाजल्यानंतर पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. तर पहाटे ५ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी असणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.
दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू
मुंबईतील सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मेडिकल दुकाने आठवड्यातील सर्व दिवस २४ तास सुरू ठेवू शकणार आहेत. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आठवड्याचे सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जलतरण तलाव आणि निकटचा संपर्क येऊ शकतो, असे क्रीडाप्रकार वगळून इनडोअर आणि आऊटडोअर खेळासाठी सर्व दिवस नियमित वेळेनुसार परवानगी असणार आहे. चित्रकरण नियमित वेळेनुसार करण्यास परवानगी असेल.