मुंबई- तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. या निर्णयाच्या विरोधात भारतीय जनता पक्ष न्यायालयात जाणार असल्याचे निलंबित आमदार आशिष शेलार यांनी सांगितले. न्यायालयात जाण्याआधी या पूर्ण घटनेसंदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर न्यायालयाचे दार ठोठावले जाईल, असेही आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. राजकीय षडयंत्र करून 12 आमदारांची नावे सरकारी पक्षाकडून घेण्यात आली. या 12 आमदारांच्या नावांची यादी का तयार करण्यात आली याचाही खुलासा लवकरच करणार असल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी कोणतेही गैरवर्तन केले नाही, कोणालाही शिवीगाळ केली नाही, तसेच निलंबनाची कारवाई करण्याआधी आमदारांचे म्हणने देखील मांडण्याची संधी दिली गेली नसल्याची खंत आशिष शेलार यांनी व्यक्त केली. त्यामुळे या निलंबनाच्या कारवाईचा आम्ही निषेध करतो, असेही यावेळी आशिष शेलार म्हणाले.
सीसीटीव्ही फुटेज समोर ठेवावेत
महाराष्ट्र विधिमंडळाच्या २ दिवसीय पावसाळी अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभागृहात गदारोळ केला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडल्याचे कारण देत भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले. मात्र, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात घडलेल्या घटनेत पूर्ण सीसीटीव्ही फुटेज समोर आणले गेले पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली. तसेच घटना घडत असताना उपाध्यक्ष यांच्या दालनात शिवसेनेचे आमदारही होते. त्या आमदारांवर कारवाई का केली गेली नाही? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला.