मुंबई -देशाची दुसरी खासगी ट्रेन असलेली मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस (Tejas Express) उद्यापासून आठवड्याचे सहा दिवस धावणार आहे. पूर्वी तेजस एक्सप्रेस आठवड्यातून पाच दिवस धावत होती. मात्र, आता इंडियन रेल्वे टुरिझम अँड केटरिंग कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) सहा दिवस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते गुजरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सहा दिवस धावणार तेजस एक्स्प्रेस-वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रेन क्रमांक 82901/82902 मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस बंद करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 7 ऑगस्ट 2021 पासून पुन्हा तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. मात्र प्रवासी कमी असल्याने शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार असे आठवड्यातील चार दिवस तेजस एक्स्प्रेस धावू लागली होती. 22 डिसेंबर 2021 पासून बुधवार जोडून आठवड्यातील 5 दिवस तेजस एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र आता गुजरात आणि महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध पूर्णपणे हटविण्यात आल्याने आयआरसीटीने मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस चालण्याचा निर्णय घेतलेला आहे.