मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पाऊस पडत नसल्याने मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट होते. मात्र गेल्या आठवडाभरात तलावक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने तुळशी, विहार पाठोपाठ तानसा व मोडक सागर ही दोन धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. तसेच तलावांमध्ये ५३.८६ टक्के पाणीसाठा जमा झाल्याने मुंबईकरांवरील पाणी कपातीचे संकट कमी झाले आहे.
समाधानकारक पाऊस-
मुंबईत दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस पडतो. या चार महिन्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी सात धरण आणि तलावांमध्ये साठवून वर्षभर मुंबईकरांना पुरवठा केला जातो. मुंबईला दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर तर वर्षाला १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. धरण आणि तलावांमध्ये पाणीसाठा कमी असल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट निर्माण होते. यंदा ९ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. चार ते पाच दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने दडी मारली होती. शुक्रवार शनिवारपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. धरण आणि तलाव क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत असल्याने आज २२ जुलै रोजी सातही धरणात ७ लाख ७९ हजार ५६८ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे.
धरणात ५३.८६ टक्के पाणीसाठा-
मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, अप्पर वैतरणा, तुळशी व विहार या सात धरणांतून मुंबईला रोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. सध्या धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन ७ लाख ७९ हजार ५६८ दशलक्ष लिटर म्हणजेच ५३.८६ टक्के इतका पाणीसाठा आहे.
'ही' चार धरणे भरली-
समाधानकारक पाऊस पडत असल्याने सातही धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. १६ जुलैला तुळशी धरण ओसंडून वाहू लागले. तर सात धरणांपैकी दोन मुख्य तलाव तानसा आज सकाळी ५.४८ मिनिटांनी ओव्हर फ्लो झाला आहे. तसेच मोडक सागरही आज पहाटे ३ वाजून २४ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मुंबईकरांचे पाणी कपातीचे संकट कमी झाले आहे.
धरण, तलावांमधील पाण्याची स्थिती (२१ जुलै २०२१)-
मोडक सागर - १,२८,९२५ दशलक्ष लिटर
तानसा - १,४४,५९३ दशलक्ष लिटर