मुंबई -भारत निवडणूक आयोगामार्फत नवमतदारांपर्यंत निवडणूक संदर्भात माहिती पोहोचवण्यासाठी राज्यात 'मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग' (स्वीप) हा जागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली.
दृकश्राव्य माध्यमातून मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व सहभाग ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास राज्याचे स्वीप सल्लागार दिलीप शिंदे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक गणेश रामदासी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्त रूबल अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनावणे, कामगार विभागाचे उपसचिव दादासाहेब खटाळ, कृषी विभागाच्या सरिता देशमुख, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, एड्स नियंत्रण संस्था आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
- नियोजनबद्ध कार्यक्रम -
सर्वसमावेशक सहभाग हे लोकशाहीचे मूलतत्व असल्याने शासकीय- निमशासकीय विभाग, अशासकीय संस्था, स्वायत्त संस्था, युवा-स्त्रिया, दिव्यांग, तृतीय पंथी, ग्रामीण-शहरी नागरिक, आदिवासी, स्थलांतरीत अशा विविध घटकांच्या सक्रिय सहभागाने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी एकत्रितरित्या कार्य करणे आवश्यक आहे. सर्व विभागांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
- अनेक घटकांनी एकत्रित या -
सहभाग हा लोकशाहीमध्ये महत्वाचा घटक असून, प्रत्येक विभागाच्या सहभागानेच हे शक्य आहे. नवमतदारांची नोंदणी, नाव वगळणे, नावात बदल अथवा इतर काही बदल करावयाचे असल्यास ते कशापद्धतीने करावयाचे यासंदर्भात मतदार जागरूकता मंचांतर्गत जागरूकता करणे गरजेचे आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला व दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटीत-असंघटीत कामगार, युवा, प्राध्यापक, वंचित घटकांसाठी काम करणारे कार्यकर्ते, अशा अनेक घटकांनी एकत्रितरित्या काम करणे आवश्यक असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले.