मुंबई - ठाणे आणि दिवा पाचव्या - सहाव्या मार्गावरील वळणासाठी नव्याने टाकलेल्या रुळावरून सध्याच्या धीम्या मार्गावरील रूळाना जोडण्यासाठी कळवा आणि दिवा दरम्यानच्या मध्य रेल्वेने (Central Railway) तब्बल 24 तासांचा जम्बो ब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. रविवारी मध्य रात्री 2 ते सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत 150 पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या, असून 20 पेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर अंधेरी आणि वांद्रे टर्मिनस दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे.
असा असणार मेगाब्लॉक-
या ब्लॉक कालावधीत शनिवारी मध्य रात्री 11.52 वाजलेपासून ते रविवारी 11.52 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबणार नाहीत. पुढे मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवले जातील आणि गंतव्य स्थानकावर निर्धारित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने पोहोचतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या / अर्ध जलद सेवा मुलुंडहून येथून रविवारी पहाटे 05.05 वाजलेपासून ते सोमवारी दुपारी 1.15 वाजेपर्यंत मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत आणि गंतव्यस्थानकावर 10 मिनिटे उशिराने पोहोचतील.
या स्थानकांवर लोकल उपलब्ध होणार नाही-
ब्लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अनुक्रमे ठाणे, दिवा, डोंबिवली आणि कल्याण येथून गाड्यांमध्ये चढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांच्या हितासाठी रेल्वे प्रशासनाने महापालिका परिवहन उपक्रमाशी समन्वय साधून बसेस चालवण्याची व्यवस्था देखील केली आहे. संपूर्ण ब्लॉक कालावधीत डोंबिवली येथून सुटणाऱ्या /टर्मिनेट होणारे लोकल सेवा उपलब्ध नसतील. याशिवाय ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा स्थानकाच्या जलद मार्गावरील फलाटांवर थांबतील.