मुंबई - कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो 3 प्रकल्पातील 36 वा ब्रेक थ्रू अर्थात भुयारीकरणाचा 36 वा टप्पा आज यशस्वीपणे पार करण्यात आला आहे. सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ (CSMIA-T1) स्थानक असा हा 36 वा टप्पा असून हा १.५ किमी लांबीचा आहे. तर याबरोबरीने पॅकेज 6 मधील भुयारीकरणाने काम 100 टक्के पूर्ण करण्यात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने यश मिळवले आहे. तर महत्वाचे म्हणजे आतापर्यंत एकूण प्रकल्पातील 93 टक्के भुयारीकरणही यानिमित्ताने पूर्ण झाले आहे.
मेट्रो 3 मधील 36 वा ब्रेक थ्रू यशस्वीपणे पार तापी 1 आणि तापी 2 टीबीएम मशीनने केली 4.4 किमीच्या भुयारीकरणाची कामगिरी
33.5 किमीच्या मेट्रो 3 च्या भुयारीकरणासाठी अत्याधुनिक अशा टीबीएम मशीनचा (टनेल बोरिंग मशीन) वापर करण्यात येत आहे. साधारणतः चार वर्षापूर्वी मुंबईच्या पोटात मोठाले असे 17 टीबीएम मशिन एक एक करत सोडण्यात आले आहेत. आता हे टीबीएम आपली भुयारीकरणाची जबाबदारी पूर्ण करत एक एक करून बाहेर येत आहेत. त्यानुसार आज सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ (CSMIA-T1) स्थानक असा हा 36 वा टप्पा असून हा १.५ किमी लांबीच्या भुयारीकरणाचे काम पूर्ण करत तापी 1 हे टीबीएम बाहेर पडले. दरम्यान तापी 1 आणि तापी 2 या टीबीएमने 15 महिन्यात 4.4 किमीचे भुयारीकरण पूर्ण करत मेट्रो 3 ला वेग दिला आहे. दरम्यान आजच्या 36 व्या ब्रेक थ्रूलाकोची मेट्रो रेलचे व्यवस्थापकीय संचालक अल्केश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेट्रो 3 मधील 36 वा ब्रेक थ्रू यशस्वीपणे पार 50.3 किमीचे भुयारीकरण पूर्ण
मेट्रो 3 प्रकल्प 33.5 किमीचा असून यात अंदाजे 56 किमीचे भुयारीकरण करण्यात येत आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दोन मार्गिका मिळून हे भुयारीकरण आहे. अशावेळी आज पॅकेज 6 मधील 100 टक्के भुयारीकरण 36 व्या ब्रेक थ्रू च्या माध्यमातून झाले. तर त्याचवेळी एकूण भुयारीकरणापैकी 93 टक्के अर्थात 50.3 किमीचे भुयारीकरण ही आता पूर्ण झाले आहे. तेव्हा हा प्रकल्प एक एक टप्पा पूर्ण करत वेगाने पुढे जात आहे. मात्र त्याचवेळी मेट्रो 3 च्या कारशेडचा मुद्दा कधी निकाली निघतो यावर मुंबईकरांना भुयारी मेट्रो तून कधी प्रवास करायला मिळणार याचे उत्तर अवलंबून आहे.