मुंबई - सुबोध जयस्वाल राज्याचे पोलीस महासंचालक असताना त्यांनीच पोलिसांच्या बदल्या आणि इतर शिफारशी मंजूर केल्या होत्या. त्यामुळे सीबीआयचे प्रमुख सुबोध जयस्वाल यांनी स्वतः लाच यामध्ये संभाव्य आरोपी म्हणून पाहावे, असा युक्तिवाद राज्य सरकारच्यावतीने गुरूवारी हायकोर्टात करण्यात आला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) तपास सुरू आहे.
हायकोर्टाने 5 एप्रिलला या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले होते
अनिल देशमुखांविरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी सीबीआय राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना बजावलेल्या समन्सविरोधात राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर गुरुवारी न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. हायकोर्टाने 5 एप्रिलला या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश दिले होते.
अनिल देशमुखांनी स्वतःचीच चौकशी करण्यासारखे आहे
साल 2019 ते 2020 काळात देशमुख राज्याचे गृहमंत्री तर जयस्वाल पोलीस महासंचालक होते. जयस्वाल यांनीच या बदल्या आणि पदांच्या शिफारशी मंजूर केल्या होत्या. आणि आता तेच जयस्वाल सीबीआय प्रमुख आहेत. हे म्हणजे अनिल देशमुखांनी स्वतःचीच चौकशी करण्यासारखे आहे. असा युक्तिवाद राज्य सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी केला. तेव्हा सीबीआयने आता जयस्वाल यांनाच बदल्यांची शिफारस का केली?, असा सवाल का विचारू नये,? या प्रकरणात सीबीआयचे संचालाकच संभाव्य आरोपी असताना निष्पक्ष तपास सुरू असल्याचे सांगणे हे हास्यास्पद असल्याचंही खंबाटा यांनी कोर्टाला सांगितले आहे.