मुंबई- जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून 31 मे जगभरात साजरा केला जातो. तंबाखू सेवनापासून रोखण्यासाठी शासनाकडून विविध संघटनांकडून जनजागृती देखील केली जाते. मात्र तरीही तंबाखू सेवनाचे वाढत चालले आहे. आता तर मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये ई हुक्का पेन ओढण्याचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारने रेस्टॉरंट व पार्लरमध्ये हुक्का बंदी केली आहे. तरीही ई हुक्क्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढल्याची धकायदायक बाब एका सर्व्हेनुसार उघड झाली आहे. बारीक स्केच पेनमधून हुक्का पिण्याचे प्रमाण शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाढले आहे. शाळेत प्रथम याची भनक देखील कधी कोणाला लागली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी ई हुक्का ओढताना विद्यार्थी पकडले गेल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहेत. त्यानंतर ई हुक्क्याचे अधिकाअधिक प्रमाण वाढत चालले आहे. हे लक्षात घेता यावर एका संस्थेच्या सर्व्हेनुसार याचे प्रमाण मुंबईत वाढल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
सलाम बॉम्बे फाउंडेशन या गेल्या चौदा ते पंधरा वर्षापासून तंबाखूविरोधी काम करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ई-हुक्क्याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये सर्व्हे केला. त्यानुसार, मुंबईत ई हुक्का ओढण्याचे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांपैकी 33 टक्के तरुणांमध्ये प्रमाण आढळून आले आहे. त्यामध्ये 15 टक्के इतकी मुलं रोज ई हुक्का ओढत आहेत. मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक आहे. हे फार धक्कादायक असल्याची माहिती फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सुमारे वर्ष-दीड वर्षापूर्वी बाजारात हुक्का पेन नावाची हुबेहूब पेन सारखी दिसणारी वस्तू मुलांना अगदी सहज मिळत असल्याचे उघडकीस आले होते. या ई हुक्क्यात सुगंधी द्रव्ये वापरली जातात. त्यामध्ये काही प्रमाणात निकोटिन असते. मुलांना ई हुक्क्याची सवय लागली, की त्यातील सुगंधी द्रव्याची जागा तंबाखूजन्य सिगरेटस कधी घेते हे मुलांच्या ध्यानात येतच नाही. मग या हुक्का पेनची सवय मुलांना जडू लागते हे वाईट आहे. हे लोकांच्या लक्षात येत नाही. व्यसनाची पहिली पायरी म्हणून ई हुक्क्याकडे पाहिले जाते. त्यामुळे मुळावरच घाव घालण्याची गरज असताना देखील सरकार त्यावर कोणतीही कारवाई करत नाही. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेली पिढी सध्या हुक्का पार्लर बंद असल्यामुळे ई हुक्क्याकडे आकर्षित होताना दिसते. त्यामुळे या ई हुक्का कंपन्यांवर बंदी आली पाहिजे, नाही तर याचे मोठे परिणाम तरुणाईला भोगावे लागतील असे सलाम बॉम्बेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.