मुंबई- पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ७ ने रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ३४ लाख रुपये इतक्या किंमतीचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे.
मानखुर्द परिसरात कोट्यवधीचे रक्तचंदन जप्त, गुन्हे शाखेची कारवाई
पोलिसांनी गुरूवारी मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचून रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ कोटी ३४ लाख रुपये इतक्या किंमतीचे रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे.
घाटकोपर पश्चिम येथील गुन्हे शाखा कक्ष ७ च्या अधिकाऱ्यांना मुंबईत रक्तचंदनाची तस्करी करून ते चोरीच्या मार्गाने विदेशात पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचला. संध्याकाळच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार एका टेम्पोतून चंदन घेऊन जात असल्याचे पोलिसांनी पाहिले. त्या टेम्पो चालकाला मंडळा येथील अग्निशमक दलाच्या केंद्राजवळ थांबवून तपासणी केली असता काही पांढऱ्या पोत्यांमध्ये तुकडे केलेले रक्तचंदन आढळून आले.
याबाबत आरोपी चालक अफसर रहीम आणि त्याचा साथीदार बाबुसाहेब भोसले यांच्याकडे कागद पत्रांची मागणी केली असता त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना गुन्हे शाखा ७ घाटकोपर कार्यालयात आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून हे रक्तचंदन जप्त केले आहे. याबाबत यातील मुख्य सूत्रधारांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे.