मुंबई - जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरस मुंबईपर्यंत पोहचला आहे. मुंबईत या व्हायरसचे १५ रुग्ण आढळले असून त्यामधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालिका अतिरिक्त आयुक्त आणि पालिका अधिकाऱ्यांना विशेष निधी खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
कोरोना; विशेष निधी खर्च करण्यास पालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी - bmc corona news
जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरस मुंबईपर्यंत पोहचला आहे. मुंबईत या व्हायरसचे १५ रुग्ण आढळले असून त्यामधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
चीनमधून कोरोना व्हायरस सर्व जगभरात पसरला आहे. भारतातही या व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. या व्हायरसचे मुंबईमध्ये १५ तर महाराष्ट्रात ४० रुग्ण आहेत. एका रुग्णाचा मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने मुंबईमध्ये 'एपीडिमीक डिसीज ऍक्ट १८९७' व 'प्रिव्हेन्शन ऑफ स्प्रेड ऑफ डेंजरस ऍक्ट अंडर एमएमसी कायदा १८८८' अंतर्गत विलगीकरण, अलगीकरण कक्ष, खासगी डॉक्टर, औषधे, साहित्य, उपकरणे खरेदी करण्यासाठी, प्रयोगशाळांची क्षमता वाढवण्यासाठी, व्हायरसच्या रुग्णांचे टेस्टिंग करण्यासाठी लागणारा विशेष निधी खर्च करता यावा म्हणून आज मंजुरी देण्यात आली.
यानुसार आरोग्य विभागाचे अधिकार असलेल्या अतिरिक्त आयुक्तांना ५ ते १० कोटी, उप आयुक्त रमेश पवार व पराग मसुरकर यांना १ ते ५ कोटी, पालिकेच्या सर्व सहायक आयुक्त आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना २५ लाख तर केईएम रुग्णालयाच्या डीनला ५० लाखांपर्यत खर्च करण्याचे अधिकार एपीडिमिक कायद्यानुसार विशेष बाब म्हणून देण्यात आले आहेत.