मुंबई : ऐन दिवाळीत आपल्या मागण्यांसाठी जनतेला वेठीस धरत राज्यातील काही आगारातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप पुढील आदेशापर्यंत मागे घ्यावा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाकडून असतानाही आजही राज्यातील काही आगारांमधील संप सुरूच आहे. राज्यातील 250 आगारांपैकी 55 आगार या संपामुळे बंद पडले असून नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी संप सुरूच; राज्यातील 55 एसटी डेपो बंद!
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप पुढील आदेशापर्यंत मागे घ्यावा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाकडून असतानाही आजही राज्यातील काही आगारांमधील संप सुरूच आहे. राज्यातील 250 आगारांपैकी 55 आगार या संपामुळे बंद पडले आहेत.
संपामुळे कोट्यवधींचे नुकसान -
एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने एसटी महामंडळासोबत झालेल्या यशस्वी चर्चेअंती आपले आंदोलन २८ आक्टोबरच्या मध्यरात्री पासून मागे घेतले आहे. तरीही विविध आगारातील, वेगवेगळ्या स्तरावरील कामगारांनी आंदोलन, संप, निर्देशने सुरू ठेवली आहेत. आता या संदर्भात संघर्ष एसटी कामगार संघटना व महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटना यांनी एसटी महामंडळाला संप पुकारल्याची नोटीस दिली होती. संपामुळे दिवाळीच्या सुट्टीत महामंडळाच्या सेवेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी महामंडळाने या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात बुधावरी आव्हान दिले. या याचिकेवर गुरुवारी रात्री सुनावणी झाली असता संघटनांनी संप मागे घेण्याचे निर्देश न्यायालयाने कामगार संघटनाला दिले आहे. तरी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाचा आदेशाला केळाची टोपली दाखवत, गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरूच ठेवला आहे. संपा दुसऱ्या दिवशी म्हणजे आज राज्यातील 55 आगार बंद पडले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या गैरसोयी बरोबरच एसटी महामंडळाला कोट्यावधी रूपयांचा फटका बसला आहे.
राज्यातील हे आगार बंद-
औरंगाबाद विभागातील बीड, पाटोदा, आष्टी आणि गेवराई आगार बंद आहे. तर भंडारा विभागातील तिरोडा, तुमसर, गोंदिया, पवनी, साकोली हे आगार बंद आहे. तर गडचिरोली विभागातील अहेरी गडचिरोली ब्रह्मपुरी आगार बंद आहे. चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, राजुरा चिमूर आणि वरोरा आगार बंद आहे. याशिवाय वर्धा विभागातील वर्धा, आर्वी, पुलगाव आणि हिंगणघाट आगार बंद आहे. सोलापूर विभागातील अक्कलकोट, सोलापूर आणि मंगळवेढा आगर बंद आहे. राज्य परिवहन महामंडळातील राज्यातील एकूण 250 आगारा पैकी आज 55 आगार संपामुळे बंद पडलेली आहे तर 195 आगार सुरू आहे.
संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय-
ग्रामीण भागात खेडोपाड्यात जाण्यासाठी लालपरीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. दिवाळीच्या हंगामामुळे खरेदीसाठी प्रवासी घराबाहेर पडतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो आहे. खासगी वाहतूकदारांकडून एसटीच्या तिकीटाच्या दुप्पट ते तिप्पट भाडे आकारत आहेत. वाहनांच्या क्षमतेपेक्षाही अधिक प्रवाशांची वाहतूक खासगी वाहतूकदारांकडून सर्रास सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या बेकायदेशीर संपाचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाडा भागाला बसला आहे. आधीच तोट्यात गेलेल्या एसटी महामंडळाला नवसंजीवनी देण्याची गरज असताना, कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रवाशांनी देखील एसटी कर्मचाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करत आहेत.