मुंबई : राज्यात विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा कायम असताना, मंत्री बदलाचे वारे वाहू लागल्याची चर्चा रंगू लागली आहे. कॉंग्रेसकडून दोन खात्यांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेले शिवसेना-राष्ट्रवादी देखील खांदेपालट करण्याच्या तयारी असल्याचे समजते आहे. शिवसेना-राष्ट्रवादीकडून याबाबत अद्याप कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. तर कॉंग्रेसकडून मंत्री बदलाबाबत अद्याप कोणतीही चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
मंत्रीपदावरुन कॉंग्रेसमध्ये मतभेद
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्ष पद स्विकारले. यामुळे कॉंग्रेसकडे असलेले विधानसभा अध्यक्षपद अद्याप रिक्त आहे. या पदावरुन आता कॉंग्रेसमध्येच वादाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे. पटोले यांनी नितीन राऊत यांच्याकडे असलेले उर्जा खाते आपल्याला मिळावे, यासाठी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे नितीन राऊत आणि पटोले यांच्यात वादाला तोंड फुटल्याची चर्चा आहे. यासंदर्भात राऊत यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही दिल्लीतून बोलावणे आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
कोण होणार विधानसभा अध्यक्ष?
दोन अधिवेशने होऊनही तरी कॉंग्रेसकडून अद्याप विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यात आलेला नाही. दरम्यान, नितीन राऊत यांचेही नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. मात्र, राऊत मंत्रीपद सोडण्यास तयार नसल्याचे समजते आहे. राऊत यांच्याकडील उर्जा खाते पटोलेंना दिल्यास पक्षात अर्तंगत कलह निर्माण होईल, अशी भीती कॉंग्रेसला आहे. त्यामुळे चाचपणी करुनच अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, असे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संग्राम थोपटे यांचेही नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याचे समजते आहे.
सुमार कामगिरी असणाऱ्यांना डच्चू?
याशिवाय सुमार कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांना बदलणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या होत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अद्याप कोणतीही महत्वाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. तर काँग्रेसकडून अमीन पटेल, नसीम खान, प्रणिती शिंदे हे नेतेही मंत्रीपदासाठी इच्छुक असल्याची चर्चा कॉंग्रेसच्या गोटात आहे. मात्र, त्यांच्यासाठी कुणाला मंत्रीपद गमवावे लागणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
राष्ट्रवादीकडून रिक्त मंत्री पद भरणार?
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर देशमुख यांना पदावरुन पायउतार व्हावे लागले. देशमुख यांच्याकडे असलेले महत्वपूर्ण गृहखाते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मर्जीतील दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले. तर वळसे-पाटील यांच्याकडील उत्पादन शुल्क हे खाते अजित पवार यांना वर्ग करण्यात आले. त्यामुळे एका अर्थाने राष्ट्रवादीतही एक मंत्रीपद रिक्त असल्याने ते भरले जाणार का याचीही चर्चा होताना दिसत आहे.
संजय राठोड पुन्हा मंत्रीमंडळात?
शिवसेना आमदार व माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर राठोड यांना मंत्री पद सोडावे लागले. या प्रकरणाची चौकशी सुरु असून राठोड यांना अद्याप क्लीन चिट मिळालेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या खात्याची सध्या सूत्रे आहेत. मात्र, रवींद्र वायकर, भास्कर जाधव, आशिष जयस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर हेही शिवसेनेतील आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्याचबरोबर संजय राठोडही पुन्हा मंत्रीपद मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. आता याबाबत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या घटक पक्षांकडे किती मंत्री?
शिवसेना - 12 कॅबिनेट तर 3 राज्यमंत्री
राष्ट्रवादी - 12 कॅबिनेट तर 4 राज्यमंत्री
कॉंग्रेस - 10 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्री
खांदेपालटाची शक्यता?
पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यासाठी कॉंग्रेसचा दबाव होता. कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही निवडणुक पुढे ढकलण्यात आली. मात्र, आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. दरम्यान, मंत्रिमंडळातील रिक्त जागांबरोबरच काही बदल किंवा खांदेपालट होण्याची शक्यता आहे, असे मत राजकीय विश्लेषक दिलीप सपाटे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.
हेही वाचा -समर्थकांची गर्दी : पंकजा मुंडेंविरोधात गुन्हा दाखल