मुंबई- राज्यात युतीचा जागा अदलाबदलीचा तिढा अजूनही कायमच असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. युती होणारच अशी घोषणा केली खरी. मात्र, अशा काही भाजपच्या अधिकृत जागा आहेत जिथे भाजपच्या विरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे वरच्यावर दिसणारी युती अंतर्गत वादामुळे चर्चेचा विषय बनली आहे. कणकवलीमध्ये तर राणेंविरोधात शिवसेनेने थेट उमेदवारच उभा केला आहे. त्यामुळे कोकणात राणेविरुद्ध सेना असा संघर्ष येत्या काळात पेटण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...
भाजपच्या नितेश राणेंविरुद्ध सेनेचे सतीश सावंत रिंगणात
कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. येथे भाजप-सेनेची युती असतानाही शिवसेनेने स्वतःचा अधिकृत उमेदवार नितेश राणेंविरुद्ध रिंगणात उतरवला आहे. येथे शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.
कल्याण पूर्वमध्ये भाजपविरोधात सेनेचा बंडखोर उमेदवार -
कल्याण पूर्व मतदारसंघ युतीमध्ये भाजपला देण्यात आला आहे. त्यानंतर या मतदारसंघात शिवसेनेचे उल्हासनगर महापालिका विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी शक्तिप्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मुक्ताईनगरमध्ये भाजपविरोधात सेनेचे जिल्हाप्रमुख रिंगणात -
मुक्ताईनगर मतदारसंघ हा भाजपकडे असून येथे एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे येथील शिवसैनिक नाराज होऊन शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
हेही वाचा - विधानसभेच्या मैदानातून खडसेंची माघार, रोहिणी खडसेंना सहकार्य करण्याचे आवाहन
गेवराईत भाजप उमेदवाराविरोधात सेनेचा बंडखोर उमेदवार -
बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघ हा भाजपकडे आहे. येथून भाजपने अॅड. लक्ष्मण पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे येथील शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.