मुंबई - कोविड-१९ विषाणुंचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर शनिवार ४ सप्टेंबर रोजी लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे आज लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
दुसऱ्या डोससाठी विशेष सत्र-
सध्या कोविड-१९ या आजाराची रुग्णसंख्या काहीशी वाढत आहे. तसेच, कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी वर्तवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेऊन नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे. या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेने, मुंबईतील सर्व शासकीय व सार्वजनिक लसीकरण केंद्रावर, आज कोविड-१९ लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित केले आहे. म्हणजेच, आज लसीकरण केंद्रांवर कुणालाही पहिला डोस दिला जाणार नाही. दुसरा डोस देय असणाऱ्या नागरिकांनी सदर सत्राचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.