महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीएमसी बजेट २०१९-२० - पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पेंग्विन दर्शनाबरोबर अल्पोपहार

पेंग्विन पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून शुल्क आकारले जाते. तर महापालिका शाळेतील मुलांच्या सहलींना निशुल्क परवानगी देण्यात येते. महापालिका शाळेत सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या मुलांना पेग्विंनच्या दर्शनासाठी प्रशासनाकडून विशेष सेवा- सुविधा पुरवणार आहे. यंदा २०१९- २० च्या अर्थसंकल्पात सहलीसांठी येणाऱ्या मुलांना अल्पोपहार देण्यासाठी तरतूद केली आहे. यापूर्वी सहलींकरिता प्रत्येकी ५८५ रुपये तरतूद केली जात होती. मात्र, यंदापासून प्रत्येकी १००० रुपये देण्यात येणार आहेत. शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पात तशी नव्याने तरतूद करण्यात आली आहे.

By

Published : Feb 1, 2019, 10:56 AM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना राणीबागेतील पेंग्विन पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नव्हते. मात्र आता पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना पेंग्विन पाहण्यासाठी शाळेपासून राणीबागेत आणण्याचा तसेच अल्पोहाराचा खर्च पालिकेकडून केला जाणार आहे. तशी तरतूद पालिकेच्या शिक्षण विभागाच्या २०१९ - २० च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात मार्च २०१७ मध्ये दुर्मिळ ‘हम्बोल्ट पेंग्वीन' आणण्यात आले. नागरिकांना हे पेंग्विन पाहण्यासाठी जूनपासून खुले करण्यात आले. तेव्हापासून राणीबागेला भेट देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. सध्या दररोज सुमारे १० हजार, तर सुट्टीच्या दिवशी सुमारे २० हजार नागरिक पेंग्वीन कक्षासह राणीची बाग बघण्यासाठी येत आहेत.दिव्यांगासाठी स्वतंत्र बस सेवा
पालिका शाळांतील मुलांना मोफत बस सेवा पुरवली जाते. याच बसमधून दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत होता. दरम्यान, घरांपासून बस स्टॉपपर्यंत यावे लागत होते. दिव्यांग विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना होणारा त्रास लक्षात घेता प्रशासनाने दिव्याग मुलांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरु करण्याचे ठरविले आहे. ही बस मुलांच्या घरी जाऊन शाळेपर्यंत आणून सोडणार आहे.

स्पर्धात्मक मानधनात वाढ


महापालिकेमार्फत बाळासाहेब ठाकरे चित्रकला स्पर्धा, महापालिका शिष्यवृती परिक्षा, मैदानी स्पर्धा आदी विविध स्पर्धापरिक्षा भरविल्या जातात. स्पर्धेतील उत्तीर्ण विद्यार्थ्याला मानधन व पारितोषिक देण्यात येते. शिक्षकांना महापौर पुरस्कारही दिले जातात. या सर्व पुरस्कारांच्या मानधनात नव्या अर्थसंकल्पात वाढ केली जाणार आहे.

समिती सदस्यांचा अभ्यास दौरा


महापालिकेतर्फे वैधानिक आणि विशेष समित्यांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. मात्र, शिक्षण समितींच्या सदस्यांसाठी अशा दौऱ्यांसाठी कोणतीही तरतूद नव्हती. येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाणार आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details