मुंबई- कोरोना संसर्गाने देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीही नागरिक घराबाहेर पडून गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. राज्यातील मुंबई, पुणे, यवतमाळ, सोलापूर आदी ठिकाणी प्रचंड प्रमाणात रुग्ण वाढले आहेत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचा वेग धडकी भरवणारा आहे.
राज्य नियंत्रण कक्षाने १९ एप्रिलला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 4200 कोव्हीड 19 विषाणुचे पॉझिटीव्ह रुग्ण होते. तर, 223 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आठवडाभरात यामध्ये मोठी वाढ झाली. 26 एप्रिलला जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 8068 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली. तर, 342 जणांचा मृत्यू झाला. राज्यात जवळपास दुप्पटीने रुग्ण वाढले आहेत. हे आकडे राज्य सरकारची चिंता वाढवणारे आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या पत्रकार परिषदेत पुण्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. पुण्यात 9 चाचण्यांमागे 1 रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह निघत आहे. तर देशात हेच प्रमाण 23 मागे 1 रुग्ण असे आहे.
राज्याच्या एकूण स्थितीचा विचार केल्यास पुणे, ठाणे, सोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. पुणे आणि ठाण्यात रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. तर यातुलनेत सोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या तिप्पटीने वाढली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण नव्हता, तिथेही रुग्ण आढळू लागले आहेत. नांदेड आणि भंडारा हे जिल्हे ग्रीन झोनमधून बाहेर निघाले आहेत. त्यामुळे कोरोना विषाणू राज्याला झपाट्याने विळखा घालत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात 19 एप्रिलला 87 हजार 254 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. 6 हजार 743 नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. कोरोना रुग्ण सापडलेल्या राज्यातील 368 भागाला कंटेनमेंट जाहीर करण्यात आले होते. तर, 19 एप्रिलला जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 1 लाख 36 हजार 926 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 9 हजार 160 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
राज्यात कोरोनामुळे झालेले मृत्यू
19 एप्रिलला राज्यात 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात मुंबईतील 6 आणि मालेगाव येथील 4 तर सोलापूर आणि जामखेड येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश होता. मृतात 4 पुरुष तर 8 महिलांचा समावेश होता. त्यातील 8 रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार असल्याचेही पुढे आहे आहे. 19 एप्रिलला राज्यात झालेल्या मृतांची संख्या 223 झाली होती.
दरम्यान एका आठवड्यानंतर यात मोठी वाढ झाली आहे. यात 26 एप्रिलला राज्यात एकूण 19 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये मुंबईतील 12 रुग्णांचा समावेश आहे. यात 11 पुरुष तर 8 महिलांचा मृत्यू झाला आहे. 15 रुग्णापैकी 11 जणांना मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशाप्रकारचा आजार होता. आजच्या 19 रुग्णांच्या मृत्यूने राज्यातील मृतांचा आकडा 342 इतका झाला आहे.