मुंबई -नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) करण्याचा इशारा दिल्यानंतर आक्रमक शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घरावर हल्ला केला. याप्रकरणात राणा दाम्पत्याला धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यामुळे भाजपा नेते किरीट सोमैया हे राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले. यावेळी शिवसैनिकांनी सोमैया यांच्या गाडीवर दगडफेक ( Kirit Somaiya Attack Case ) करत हल्ला केला. या हल्ल्यात किरीट सोमैया यांच्या गाडीच्या काचा फुटून त्यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र राज ठाकरेंनी सुरू केलेल्या भोंग्याच्या प्रकरणात राणा दाम्पत्यापासून किरीट सोमैयांच्या एन्ट्रीपर्यंत हे प्रकरण अधिकाधिक गंभीर बनत चालले आहे, त्याचाच घेतलेला हा आढावा.
कसा सुरू झाला वाद . . . -मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशीदीवरील भोंगे काढण्यात यावे, अन्यथा 3 मे पासून मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) सुरू करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यभरातून या प्रकरणावर प्रतिक्रिया उमटल्या. राज ठाकरे यांना हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राजकारण करायचे असल्याची टीका राजकीय नेत्यांनी सुरू केली. संजय राऊत, शरद पवार यांनीही याप्रकरणी राज ठाकरेंच्या या भूमीकेवर जहरी टीका केली.
महाविकास आघाडी, मनसे आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी 16 एप्रिलला या वादात उडी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदावर आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागली ( Ravi Rana Criticized CM Thackeray ) आहे. महाराष्ट्राची ही साडेसाती दूर व्हावी, यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी 'मातोश्री'वर हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Recitation ) करावे, असे आवाहन आमदार रवी राणा यांनी केले. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी राणांच्या घरी हनुमान चालीसा पठण केले. यावर राणा यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'मातोश्री' बाहेर आपण 23 तारखेला हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जात असल्याची घोषणा केली आणि वादाला तोंड फुटले. राणा दाम्पत्याला अमरावतीतच अडवण्याचा प्रयत्न होणार होता, त्यामुळे त्यांनी गनिमीकावा करत एक दिवस आधीच मुंबई गाठली, 23 एप्रिलला शिवसैनिकांनी राणांच्या मुंबईतील घरावर हल्ला केला.