मुंबई -महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज दुपारी 3 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पत्र ते मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संपतकुमार, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री नसीम खान, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, माजी मंत्री चंद्रकात हंडोरे उपस्थित राहणार आहेत.
सोनिया गांधींचे उद्धव ठाकरेंना पत्र
शिवसेनेने एक वर्षापूर्वी गेले पंचवीस वर्षे आपला मित्र असलेल्या भाजपशी युती तोडली. ही युती तोडल्यावर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना सोबत घेऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल असे सांगण्यात आले होते. मात्र तसे होत नसल्याने, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. सरकार किमान समान कार्यक्रमावर चालत नसल्याचे सोनिया गांधी यांनी म्हटले. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.
मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावर मतभेद
आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल, असे सत्ता स्थापन करण्यापूर्वी ठरवण्यात आले होते. मात्र सत्ता स्थापन झाल्यावर अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघडीच्या घटक पक्षांमध्ये वाद असल्याचे पाहायला मिळत आहे. यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुस्लीम आक्षण! पहिल्या अधिवेशनातच कौशल्य रोजगार विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले होते. मात्र सेनेच्या मंत्र्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच निधीचे समान वाटप होत नसल्याची तक्रार देखील अनेक काँग्रेस आमदारांनी केली आहे.