मुंबई -सध्या मुंबईला पाणी पुरवठा ( Mumbai Water Supply ) करणाऱ्या सात धरणातून ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. भविष्यात मुंबईची तहान भागवण्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगा सारख्या प्रकल्पांची आवश्यकता आहे. मात्र पालिकेने ( Mumbai Municipal Corporation ) जास्त पाणी मिळेल असे प्रकल्प राबवण्याऐवजी समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती ( Approval small water project ) घेतल्याचे समोर आले आहे. नव्या
प्रकल्पांची आवश्यकता -मुंबईला मोडक सागर, तानसा, वैतरणा, भातसा, तुळसी, विहार आदी धरणांमधून दिवसाला ३८५० दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा सध्याच्या लोकसंख्येला जेमतेम पुरेल इतका आहे. पाणी पुरवठा कमी होणे, कमी दाबाने पाणी येणे यासारख्या तक्रारी मुंबईकरांच्या नेहमीच असतात. भविष्यात पालिकेला ४ ते ५ हजार दशलक्ष लिटर पाणी रोज लागणार आहे. त्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगा हे प्रकल्प प्रस्तावित आहेत. गरज भासेल त्यानुसार ही धरणे बांधली जाणार आहेत. या तीन धरणांमधून सुमारे २८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जाऊ शकतो अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता पुरुषोत्तम मालावडे यांनी दिली. सध्या पालिकेने समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मनोरी येथे २०० दशलक्ष लिटरचा हा प्रकल्प आहे असेही मालावडे यांनी सांगितले.
इतका होतो पाणीपुरवठा -मुंबई शहराला सध्या तानसा ( ४५५ द.ल.लि. प्रतिदिन ), मोडक सागर ( वैतरणा ) ( ४५५ द.ल.लि. प्रतिदिन ), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा ( ४५५ द.ल.लि. प्रतिदिन ), उर्ध्व वैतरणा ( ६४० द.ल.लि. प्रतिदिन ) भातसा ( २०२० द.ल.लि. प्रतिदिन ) या जलस्रोतातुन पाणीपुरवठा करण्यात येतो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० कि.मी. वा त्यापेक्षा जास्त अंतरावर आहेत. मुंबई शहराच्या हद्दीत केवळ दोन लहान स्रोत विहार (९० द.ल.लि. प्रतिदिन) आणि तुळशी (१८ द.ल.लि. प्रतिदिन) आहेत. मुंबई शहराला या सर्व जलस्त्रोतातून ३८५० द.ल.लि. प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.