मुंबई -देशभरात शनिवारी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र कोविन ऍपमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील लसीकरण दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले होते. आज पुन्हा एकदा लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र मुंबईमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
मुंबईमधील पालिकेच्या ९ केंद्रांवर ४ हजार लोकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ठ ठेवण्यात आले होते. मात्र ८०० लोकांची नावे दुबार आल्याने ती वगळून ३२ बुथवर ३२०० लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ १५९७ म्हणजेच ५० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. आज लसीकरणादरम्यान ३ जणांवर सौम्य दुष्परिणाम जाणवून आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. शनिवारप्रमाणे आजही आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
लसीकरणाला सुरुवात
मार्चमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर काही दिवसांतच मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाला. गेल्या दहा महिन्यांत कोरोनाला थोपवताना आरोग्य यंत्रणेची चांगलीच दमछाक झाली. मात्र पालिका आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आता चांगलीच आटोक्यात आली आहे. यातच शनिवार १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून लसीकरणाला सुरुवात केली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘बीकेसी’ कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यातील कोविड लसीकरणाचा शुभारंभ झाला. पालिकेच्या ९ आणि राज्य सरकारच्या एक अशा एकूण १० केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले. मात्र कोविन ऍपवर तांत्रिक अडचणी आल्याने लसीकरणाला स्थगिती देण्यात आली होती.