मुंबई - शहरात एका डिलिव्हरी बॉयने अवघ्या सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने चारकोप परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पीडितेच्या पालकांनी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
मुंबईतील एका इमारतीजवळ डिलिव्हरी बॉय हा डिलिव्हरी देण्यासाठी आला होता. तिथे एक 6 वर्षांची मुलगी एकटी खेळत होती. डिलिव्हरी बॉयने तिला पत्ता विचारला. त्यानंतर तो मुलीला तिथे घेऊन गेला. तिथे त्याने पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर आरोपी तिथून फरार झाला. आपल्या सोबत झालेले कृत्य सर्व मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. यावेळी संतापलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले व तक्रार दाखल केली. पोलिसांनी कुटुंबीयांच्या सांगण्यावरून पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला व तत्काळ कारवाई करत आपली सुत्रे फिरवून त्या डिलिव्हरी बॉयला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.