महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsampark Abhiyan Sabha : 'बूस्टर' नव्हे 'मास्टर'.. मुख्यमंत्र्यांच्या सभेची जय्यत तयारी तर, फडणवीसांचे वेट अँड वॉच..

बूस्टर नव्हे मास्टर, म्हणत मुंबईतील बीकेसी मैदानावर ( BKC Ground Mumbai ) शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानांतर्गत ( Shivsena Shivsampark Abhiyan ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्या १४ मे रोजी जाहीर सभा होणार ( CM Uddhav Thackeray Public Meeting ) आहे. या सभेसाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे १५ मे रोजी देवेंद्र फडणवीसांची गोरेगावात सभा होणार ( Devendra Fadnavis Public Meet Goregaon ) आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

uddhav thackeray devendra fadnavis
उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस

By

Published : May 13, 2022, 10:46 AM IST

मुंबई -शिवसंपर्क अभियानांतर्गत ( Shivsena Shivsampark Abhiyan ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या १४ मे रोजी मुंबईत, बीकेसी ( BKC Ground Mumbai ) येथे जाहीर सभा घेत ( CM Uddhav Thackeray Public Meeting ) आहेत. या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षातील खुल्या मैदानातील ही उद्धव ठाकरे यांची पहिलीच जाहीर सभा असल्याने शिवसेनेमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे लगेचच दुसऱ्या दिवशी १५ मे रोजी मुंबईत, गोरेगाव येथे विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडवणीस हे जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेला उत्तर देणार ( Devendra Fadnavis Public Meet Goregaon ) आहेत. या अनुषंगाने या दोन्ही सभांविषयी राज्यात राजकीय वातावरण रंगू लागले आहे.


सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी : १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत मोठी सभा घेऊन या सभेमध्ये अनेकांचा मास्क काढणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले आहे. या सभेविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, या सभेसाठी शिवसेनेकडून ३ टिझर सुद्धा लाँच करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एक पोस्टरही जारी करण्यात आलं आहे. "हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व" असल्याचं शिवसेनेने त्या पोस्टरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा अंश वापरून सभेसाठीचा टीझर तयार करण्यात आला आहे. यामध्ये, 'मी शिवसेना प्रमुख जरूर आहे पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे' असं टीझर मध्ये बघायला भेटतं. त्याचबरोबर साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असं आव्हानही शिवसेनेने टिझर मधून केलं आहे. तर लाँच झालेल्या तिसऱ्या टिझरमध्ये, "तुम्ही मला फक्त वज्र मूठ द्या! दात पाडायचं का मी करून दाखवतो! हिंदुत्वाचा खरा अर्थ दाखवून द्यायला, शिवसेनेच्या अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घ्यायला, यायलाच पाहिजे असं शिवसेनेच्या तिसऱ्या टीझर मध्ये म्हटलं आहे. आता १४ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री कोणाचा मास्क काढणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, राणा दाम्पत्य मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावर? :१४ तारखेला माझी सभा आहे. मला माझ्या मनात आहे, ते मी बोलणार आहे. माझं तुंबलेल नाही आहे, पण मनात काही गोष्टी आहेत त्या बोलणार आहे. १४ तारखेला अनेकांचे मास्क काढणार असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या एका कार्यक्रमात सांगत विरोधकांना थेट इशारा दिला होता. सध्या राज्यात अनेक विषय चर्चिले जात असून त्यामध्ये हिंदुत्व, विशेष करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छेडलेला भोंगा हा विषय राष्ट्रीय स्तरावर गाजत आहे. त्यासोबतच या विषयावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांना लिहिलेलं खरमरीत पत्र. या मुद्द्यांवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या सभेत उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर प्रथम क्रमांकावर असतील. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप नेते, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्या क्रमांकावर असतील. मुंबई महानगरपालिका सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने हाती घेतलेली पोल-खोल मोहीम व व सातत्याने पालिकेवर भ्रष्टाचाराचे केले जाणारे आरोप या कारणास्तव उद्धव ठाकरे या आरोपांवरून देवेंद्र फडवणीस यांना निशाण्यावर धरतील. तर हनुमान चालीसा पठण वरून निर्माण केलेला खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचा वाद. तसेच १४ मे, ला होणाऱ्या सभेत," तुम्ही कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार ते स्पष्ट करा," असं खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना केलेलं आव्हान, तसेच केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा या सर्व गोष्टींवर भाष्य करताना मुख्यमंत्री हे मुख्यमंत्रीपदाचा मुखवटा काढून शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कशा पद्धतीने विरोधकांचा समाचार घेतात याकडे सर्वांचच लक्ष लागलेल आहे.


अडीच वर्षात पहिल्यांदा खुल्या मैदानात सभा? :मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेची ओळख असलेली खुला मैदानातील राजकीय सभा ही अडीच वर्षात पहिल्यांदाच होत आहे. यापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४ महिन्यात करोनाची टालेबंदी लागली. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा व इतर राजकीय सभा झाल्या नाहीत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन किंवा सभागृहात राजकीय मेळावे घेतले. परंतु खुल्या मैदानातील ही पहिलीच सभा होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये सुद्धा या सभेविषयी उत्सुकता आहे. यापूर्वी खासदारांच्या आणि पक्षप्रवक्त्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यातूनच ठाकरे यांचा मनोदय स्पष्ट झाला होता. याचबरोबर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही तोंडावर असल्याने उद्धव ठाकरे या सभेमध्ये विरोधकांवर कशा पद्धतीची तोफ धडाडतात, हे पाहणं सुद्धा गरजेचं झालं आहे.या सभेची पूर्वतयारीची पाहणी शिवसेना नेते करत आहेत. पर्यावरण मंत्री अनिल परब, शिवसेना सचिव सुरज चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी हे सातत्याने या सभेच्या ठिकाणी जाऊन त्याची पाहणी करत आहेत.



१५ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांची सभा? :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईत गोरेगाव येथे विरोधी पक्षनेते व भाजप नेते देवेंद्र फडवणीस हे जाहीर सभा घेणार आहेत. वास्तविक या महिन्याच्या सुरुवातीलाच १ मे रोजी देवेंद्र फडवणीस यांनी मुंबईमध्ये बूस्टर सभा घेऊन सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला होता. आता १४ मे रोजीच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडवणीस सभा घेणार असल्याने अनेकांच लक्ष या सभेकडे लागले आहे. विशेष करून मागील अडीच वर्षापासून महाविकास आघाडी व भाजप यांच्यातील वाद शिगेला पोहचलेला असताना आता अनेक नवीन मुद्यांसह मुख्यमंत्री विरोधकांचा समाचार घेणार असल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडवणीस हे त्यांच्या खास शैलीत त्याला कसं उत्तर देणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं झालेलं आहे. वास्तविक या महिन्यातील भाजपची ही दुसरी मोठी सभा मुंबईमध्ये होणार असून उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांच्याकडून या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : Shivsena Teaser : 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदु बांधवांनो...''; शिवसेनेच्या सभेचा दुसरा टीझर लॉन्च

ABOUT THE AUTHOR

...view details