मुंबई -उदयनराजे भोसले यांच्या तंगड्या तोडण्याच्या धमकीला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिले. छत्रपतींचे वंशज म्हणून आम्ही तुमचा आदर करतो पण तंगड्या तोडण्याची भाषा योग्य नाही. तंगड्या तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी तंगड्या सर्वांनाच असतात हे लक्षात ठेवावे, असे राऊतांनी उदयनराजेंना सुनावले आहे. मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत बोलत होते.
उदयनराजे भोसले यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचा जोरादार समाचार घेतला होता. संजय राऊत यांनी देखील त्यांच्या सर्व वक्तव्याचा जोरदार प्रतिकार केला आणि माध्यमांसमोर परखडपणे उत्तर दिले आहे.
हेही वाचा... काश्मीर मुद्द्यावरून संयुक्त राष्ट्रसंघाचा चीनसह पाकिस्तानला पुन्हा दणका
काय म्हणाले संजय राऊत ?
'शिवसेनेवर कोणत्याही प्रकारची टीका केली जाणार, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलले जाणार, शरद पवार यांच्याबद्दल बोलणार, तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर बोलायचं, आमच्या कार्यकर्त्यांविषयी बोलायचे. हा जर तुम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार असेल, तर मग उत्तर देण्याचा अधिकार सर्वांना आहे', असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कोण कोणत्या घराण्यात जन्माला आलेला आहे, म्हणून त्याला महाराष्ट्रातील इतर श्रद्धा स्थानांविषयी बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही तुमचा आदर राखतो, तुम्ही आमचा आदर राखा. हिच महाराष्ट्राची परंपरा आणि भूमिका कायम राहिलेली आहे, आम्ही त्यानुसार वागतो, असे स्पष्ट भुमिका राऊत यांनी घेतली.