मुंबई - नितीशकुमार यांना शिवसेनेमुळेच पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार असल्याने त्यांनी आमचे आभार मानले पाहिजेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय. भाजपाने शब्द फिरवल्यामुळे महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण अस्तित्वात आले. यानंतर भाजपा कोणत्याही मित्र पक्षाला दिलेला शब्द फिरवणार नाही. त्यामुळे नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत, असे राऊत म्हणाले.
शिवसेनेमुळेच नितीश कुमार मुख्यमंत्री...जाणून घ्या संजय राऊत यांचं राजकीय समीकरण! बिहार निवडणुकीचे निकाल अद्याप पूर्ण आलेले नाहीत. मात्र या निवडणुकीत केंद्र सरकारपासून राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना एकट्या तेजस्वी यादव याने लढा दिला आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांना या निवडणुकीचा 'मॅन ऑफ द मॅच' हा किताब दिला पाहिजे, असे वक्तव्य राऊत यांनी केले.
बिहारचे सर्व निकाल अजून समोर आलेले नाहीत. 70 जागा अशा आहेत, की ज्यावर एनडीए कमी फरकाने पुढे आहे. रात्री 10 ते 11 वाजता संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. सर्व निकाल आल्यावर चित्र वेगळं असेल, असे ते म्हणाले.
'मॅन ऑफ द मॅच'
अनेक वेळा मॅच हरल्यावरही हरणाऱ्या टीममधील खेळाडूला 'मॅन ऑफ द मॅच' किताब दिला जातो. बिहार निवडणुकीतही तेजस्वी यादव हा एकटा 30 वर्षांचा चेहरा पुढे येऊन काम करत आहे. त्याला पाठिंबा नसताना देखील तेजस्वी हा एकटा लढतोय, हे महत्त्वाचं आहे. बिहार निवडणुकीत एक तरुण चेहरा देशाला मिळालाय. त्याने केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्ताधाऱ्यांशी चांगला मुकाबला केला. तेजस्वी यादव याने विकासाचा, शिक्षण बेरोजगार याचा मुद्दा समोर आणला. त्यामुळे हे मुद्दे घेऊन भाजपा आणि नितीश कुमार यांना या मुद्दयावर बोलायला लागले. यामुळे तेजस्वी यादव या निवडणुकीत मॅन ऑफ द मॅच ठरला आहे, असे राऊत म्हणाले.
भाजपाने बिहारमध्ये शब्द फिरवू नये
बिहारमध्ये जे कल हाती आले आहेत, त्यानुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. यावर बोलताना महाराष्ट्रात जसा शब्द फिरवला, तसा शब्द फिरवण्याच्या किमया बिहारमध्ये होऊ नये, असे राऊत म्हणाले. जे महाराष्ट्रात झालं, ते तिथे होऊ नये. नितेश कुमार मुख्यमंत्री व्हावे, हीच अपेक्षा आहे, राऊत यांनी म्हटले.
शिवसेनेचे आभार मानायला हवेत
भाजपाने शब्द फिरवल्यामुळे महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण समोर आले. महाराष्ट्रात जे झाले त्यावरून भाजपा बिहारमध्ये शब्द फिरवणार नाही. आमच्यामुळेच नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री होता येणार आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी शिवसेनेचे आभार मानायला हवेत, असे राऊत म्हणाले.