महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नानांच्या बोलण्यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही - शिवसेना - शिवसेनेची विरोधकांवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार 'स्वबळा'स उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे, असा टोला ही त्यांनी नाना पटोलेंसह सरकार पडण्याची स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लगावला आहे.

महाराष्ट्र सरकारचे भवितव्य
महाराष्ट्र सरकारचे भवितव्य

By

Published : Jul 14, 2021, 9:45 AM IST

Updated : Jul 14, 2021, 9:59 AM IST

मुंबई -सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधांनांमुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नाना पटोलेंवर शिवसेना आणि राष्ट्रवादी पाळत ठेवत असल्याच्या आरोपानंतर ते दोन्ही पक्ष नाना पटोलेच्या वक्तव्यावर नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने नानांच्या मन की बात वरून त्याच्या बोलण्याला महत्व नसल्याचा टोला लगावला आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे, असे सांगत शिवसेनेने सरकार पडण्याची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपा भक्तांनाही सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? असा खोचक सवाल शिवसेनेने काँग्रेसला केला आहे. कधी कधी लहान माणसेही त्यांच्या बोलण्याने राजकारण ढवळून काढतात. नानांनी तेच केले. नानांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले, पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपावरच होता. भाजपशी आमचे जमणार नाही. भाजपला मदत होईल, असे काही करणार नाही, असे नाना सांगत आहेत. त्यावर कोणी लक्ष देत नाही. नानांनी त्यांची मन की बात सांगितली. त्या मन की बातने थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह भाजपावर निशाणा साधला आहे.

नानांच्या वक्तव्यांवर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अवलंबून नाही-

लोणावळय़ातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात नानांनी 'ताव' मारला की, 'आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. मला सुखाने जगू दिले जाणार नाही.' नाना पुढे असेही म्हणाले की, 'काँग्रेसचा स्वबळाचा नारा कायम आहे'. नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार 'स्वबळा'स उत्तरे दिलीच आहेत. आम्ही एकत्र सरकार चालवतो, पक्ष नाही असे शरद पवार यांनी जाहीरपणे सांगितले ते योग्यच आहे. नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे, असा टोला ही त्यांनी नाना पटोलेंसह सरकार पडण्याची स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना लगावला आहे.

नानांकडे संजीवनी गुटिका आहे -

नानांमुळे सरकार पडेल किंवा नवे सरकार येईल, असे पोलीस खात्यातील फडणवीसांच्या अंधभक्तांना तेव्हा वाटले असेल. त्यातून नानांचे फोन चोरून ऐकण्यात आले. नाना आधी भाजपमध्ये होते. मोदी यांना चार गोष्टी सुनावून त्यांनी पक्षत्याग केला आणि काँग्रेसची धुरा खांद्यावर घेतली. महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची व राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल. नानांकडे संजीवनी गुटिका किंवा विद्या आहे व त्यामुळे ते काँग्रेस पक्षाला जागे करून पुढे नेणार आहेत. या संजीवनी गुटिकेची माहिती त्यांनी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींना दिली आहे काय? असा उपरोधिक टोलाही शिवसेनेने नाना पटोले यांना लगावला आहे.

जर दिल्लीश्वरांना अशी खबर लागलीच असेल की, महाराष्ट्रात नाना नामक विभूतीकडे काँग्रेसला संजीवनी देण्याचा मंत्र किंवा गुटिका प्राप्त झाली आहे. त्यामुळे काँग्रेस स्वबळावर सत्तेवर येऊ शकते, तर त्यांचे कान नक्कीच टवकारले गेले असतील. काँग्रेसच्या नानांना प्राप्त झालेला हा मंत्र किंवा विद्या काय आहे ते ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी नानांवर पाळत ठेवण्याचा प्रयोग केंद्राकडून सुरू आहे असेच दिसते. नाना पटोले यांचे फोन चोरून ऐकले जात आहेत तसे ते अनेकांचे ऐकले जात असावेत. महाराष्ट्रातले सरकार दिल्लीश्वरांच्या डोळय़ांत खुपत आहे. मनात सलते आहे. हे सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्राने जी महापूजा मांडली आहे आणि त्यातला तीर्थप्रसाद म्हणजे नानासारख्यांचे फोन ऐकणे. त्यांच्यावर हेरगिरी करणे. नाना त्यामुळे जास्तच उसळून उठले, असल्याचे म्हणत शिवसेनेने नानांच्या आरोपाचा आधार घेत केंद्रसरकारवर टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील हे निरागस आणि निष्पाप बालक-

नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे. मनास येईल ते दाणकन बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पाटील हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे महाराष्ट्राला जितके कौतुक तितकेच कौतुक नानांच्या रांगडय़ा बोलीचे आहे. अर्थात महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार या असल्या हसण्या, बोलण्याने, बागडण्याने ढिले पडणार नाही. ते काल मजबूत होते, आजही आहे आणि उद्यादेखील मजबूत राहील. नानांवर पाळत ठेवून सरकार पाडले जाईल या अंधभक्तीत कोणी राहू नये. शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद तसे काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद होतेच. काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी नानांनीच त्या मोठय़ा पदाचा त्याग केला हे कसे विसरता येईल? त्यागमूर्तीला त्यामुळेच सत्य वचनाचे तेज प्राप्त होते व नानांना असे तेज प्राप्त झाले आहे, असा उपरोधिक टोलाही शिवसेनेने काँग्रेससह सरकार पडण्याची स्वप्ने पाहणाऱ्या चंद्रकांत पाटलांनाही लगावला आहे.

नानांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून काँग्रेसला जमिनीवरून हवेत आणले. काँग्रेस त्यामुळे घोंघावत आहे. नाना बोलतात व काँग्रेस घोंघावते किंवा डोलते. श्री. शरद पवारांसारखे मोठे नेते नानांना छोटा माणूस मानतात. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असा टोमणा मारतात. हीच नानांच्या कार्यकुशलतेची पोचपावती आहे. नानांच्या बोलण्याने दोन दिवस राजकारणात गरमी आली, पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली काय? असा सवालही शिवसेनेने नानांच्या भूमिकेवरून विचारला आहे.

Last Updated : Jul 14, 2021, 9:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details