मुंबई -शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन महाराष्ट्रासह इतर राज्यात साजरा केला जातो आहे. 56 वर्षांच्या वाटचालीमध्ये शिवसेनेने अनेक चढ-उतार पाहिले. बेळगांवातील सीमावासिय मराठी बांधवांवर होणारे अत्याचार, महाराष्ट्रात परप्रांतियाचे होणारे अनिर्बंध अतिक्रमण, वगैरे वादग्रस्त प्रश्नांविरुद्ध शिवसेना आजपावेतो सतत लढत आली आहे. शिवसेनेने केलेली आंदोलने आणि संघर्ष सर्वांसमक्ष आणि सर्वश्रुत आहे. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे, आता उद्धव ठाकरे यांच्या एकछत्री अंमलाखाली कार्यरत असलेली संघटना राज्याच्या सत्तेतला महत्वाचा पक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या रुपात राज्यात कार्यरत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत.
शिवसेनेने खऱ्या अर्थाने राजकारणात प्रवेश केला तो ठाण्यातून. 1967 साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने दमदार पाऊल टाकत यश संपादन केले. पुढे लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचारही केला. त्याच्या पुढच्याच वर्षी प्रजा समाजवादी पक्षाबरोबर निवडणूक लढवून मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेच्या शाखा सर्वत्र दिसू लागल्या. शिवसेनेच्या शाखा म्हणजे सामान्य मराठी मानसाचा आधारस्तंभ होते. रात्री-अपरात्री शिवसैनिक मदतीला धावून येतो, अशी त्याची ख्याती होती. एक संघटना ते मोठा राजकीय पक्ष अशी शिवसेनेने मजल मारली.
1989 साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली. ती 25 वर्षे टिकली. सन 1995 साली शिवसेना आणि भाजपा युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली. शिवसेनेचे मनोहर जोशी या पक्षाचे आणि या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. तर 2014 साली भाजप आणि शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या. त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. दरम्यान, भाजपला पाठिंबा दिल्याने देवेंद्र फडणवीस हे युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले. मात्र, 2019 साली झालेल्या विधान सभा निवडणुकीनंतर फडणवीस यांनी शिवसेनेला डावलून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या सोबत हातमिळवणी करत, सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवघ्या दीड दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करत देवेंद्र फडणवीस यांना सत्तेच्या पटलावरून खड्यासारखे उचलून बाजूला केले. भाजपकडून यानंतर शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीकास्त्र आणि विविध कथित आरोपांचा भडिमार सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देऊन राज्याचा कारभार व्यवस्थित हाताळत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात कोरोनासारख्या भयंकर महामारीच्या संकटाने राज्यासह देशाला आणि जगाला हादरवले. सुमारे शंभर वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यात आणि देशात मृत्यूचे तांडव बघायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातला बराचसा वेळ, सरकारी पैसा, यंत्रणा आणि ऊर्जा या महामारीत वाया गेली. उद्धव ठाकरे यांनी धीराने आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यांना सोबत घेऊन या समस्येतून वाट काढायचा प्रयत्न केला. जागतिक स्तरावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कामांची दखल घेतली गेली. सुमारे अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता राजकीय खेळपट्टीवर स्थिरावले आहेत. खरंतर उद्धव ठाकरे तेल लावलेल्या राजकीय कुस्तीगीरांच्या फडात नवखे आहेत. तरीही यशस्वीपणे एकापाठोपाठ एक डाव जिंकत आहेत. चर्चा, समित्या, अभ्यासगट, अहवाल, पाहणी दौरे यांच्या पलिकडे जाऊन शिवसेनेने वाटचाल केली आहे. या वाटचालीत निष्ठावंत शिवसैनिकांचे योगदान मोठ आहे.