मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना मंगळवारी दुपारी रत्नागिरीत अटक करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेले आक्षेपार्ह वक्तव्य राणेंच्या चांगलेच अंगलट आल्याचे चित्र यातून दिसत आहे. रत्नागिरी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली असून राणेंची तब्यत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाने राणेंची तब्यत ठीक नसल्याचे म्हटले आहे. राणेंच्या अटकेचा भारतीय जनता पक्षाकडून विरोध होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून राणेंविरोधात राज्यभरात आंदोलन होत आहे. राणे विरुद्ध शिवसेना असे चित्र सध्या राज्यात निर्माण झाले आहे.
काय म्हणाले होते राणे
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जनआशीर्वाद यात्रे दरम्यान रायगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 'मी असतो तर कानाखालीच चढवली असती.' असे पत्रकार परिषदेत राणे म्हणाले होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही त्यांच्यासोबत होते. केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर कोकणात आलेल्या राणेंनी रायगड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात नाशिकमध्ये शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक पोलिसांनी राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. नाशिक पोलिसांच्या कारवाईनंतर रत्नागिरी पोलिसांनी राणेंच्या अटकेची कारवाई केली आहे.
पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी - जठार
केंद्रीय मंत्री राणे यांना ताब्यात घेण्यासाठी रत्नागिरी पोलीस गेले होते. पोलीस अधीक्षक स्वतः राणेंशी चर्चा करत होते. यावेळी जनआशीर्वाद यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार माध्यमांसमोर आले आणि पोलिसांनी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी केली. पोलिसांकडे अटक वॉरंट असेल तर त्यांनी ते दाखवले पाहिजे, असे जठार म्हणाले. रत्नागिरी पोलिसांनी राणेंना ताब्यात घेतले आणि राणेंना त्यांच्याच गाडीतून संगमेश्वर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. राणेंना पोलीस घेऊन जात असताना राणे समर्थकांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यापुढे राणे समर्थकांचा विरोध चालला नाही.
नाशिक पोलिसांच्या विनंतीवरुन रत्नागिरी पोलिसांची कारवाई
रत्नागिरी पोलीस राणेंना घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. नाशिक पोलिसांच्या विनंतीवरुन ही कारवाई झाली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांना फोन करुन विनंती केली. कायद्याच्या तरतुदीनुसार राणे यांना अटक करुन त्यांचा ताबा नाशिक पोलिसांकडे द्यावा. त्यानंतर, रत्नागिरी किंवा नाशिकच्या न्यायालयात त्यांना हजर केले जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय यानी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध भाजप कार्यकर्ते भिडलेले दिसत आहेत. राज्यात ठिकठिकाणी भाजप कार्यालयांवर शिवसैनिकांनी हल्ला चढवला. मुंबईतील राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी शिवसैनिकांनी आंदोलन केले. तिथे राणेंचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. त्यानंतर राज्यभरात राणेंच्या वक्तव्याचा निषेध करत शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात आले आहे.