मुंबई- काही दिवसावर दसरा येऊन ठेपला आहे. मात्र अद्यापही शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावर ( Shivaji Park Ground ) दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. आतापर्यंत शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेकडे ( Brihanmumbai Municipal Corporation ) दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेण्याबाबत तीन वेळा पत्र दिल आहे. मात्र अद्यापही महानगरपालिकेकडून याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने, शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
शिवसेनेना जाणार न्यायालयात :दसरा मेळावा करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान शिवसेनेला मिळावं यासाठी शिवसेनेना आता न्यायालयात जाणार असल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले आहे. शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेतला जातो. आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा सोनं लुटण्यासाठी राज्यभरातून आणि देशभरातून शिवसैनिक दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवाजी पार्क मैदानावर यायचे. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर येत असतात. ही शिवसेनेची परंपरा आहे आणि परंपरागत हे मैदान दसऱ्याला शिवसेनेसाठी दिल जात. यासाठी रीतसर सर्वात प्रथम महानगरपालिकेकडे शिवसेनेकडून परवानगी ही मागण्यात आली आहे. मात्र अद्याप ती देण्यात आली नसल्याची खंत ही अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे.